चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : ‘पक्षाच्या जात समूहाच्या आघाड्या तिकीट मागताना जात पुढे करतात’,“महायुतीत भाजपलाच किती जागा मिळणार हे ठरले नाही, मग कार्यकर्त्यांना ‘लॉलीपॉप’ किती वाटणार”. ही विधाने आहेत केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांची. निवडणुका जिंकण्यासाठी नेत्यांना कराव्या लागणाऱ्या कसरतींवर त्यांनी पक्षाच्याच कार्यक्रमात केलेले वरील भाष्य विनोदी शैलीतील असले तरी त्यात वास्तव दडले असल्याने त्याची पक्षपातळीवर जोरदार चर्चा आहे.

हेही वाचा >>> जळगाव पालिकेतील घडामोडींमध्ये मंत्र्यांचा हस्तक्षेप

नागपूर जिल्हा भाजप अध्यक्षाच्या पदग्रहण कार्यक्रमात गडकरी नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलीत हसत हसत, विनोद करीत मोकळेपणाने बोलले. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे होते. कधी त्यांच्याकडे बघत तर कधी त्यांचे थेट नाव घेत निवडणुकांच्या काळात नेत्यांना काय-काय करावे लागते हे व ते करताना कशा अडचणी येतात हे स्पष्टपणे सांगून टाकले. गडकरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला अनुभवाचीही जोड होती. त्यांनी पहिला प्रहार केला तो विविध जात समूहांना पक्षासोबत जोडण्यासाठी स्थापन केलेल्या विविध आघाड्यांवर. (सेल) ते म्हणाले, “अशा आघाड्यांमुळे कार्यकर्ते जोडले जातात. या आघाड्या ‘चॉकलेट’ वाटपाचे कारखाने आहेत. प्रदेशाध्यक्ष असताना मी सुद्धा हे प्रयोग केले.पण उलटे झाले. आता बावनकुळे करीत आहेत. निवडणुका येऊ द्या, या सर्व आघाड्यांचे नेते विचारतील “बावनकुळे साहेब आमचे काय ?” उमेदवारीसाठी ते जातीच्या मतदारांची टक्केवारी पुढे करतात. उमेदवारी मिळाली तर जातीमुळे आणि नाकारली तर पक्षाने जातीवर अन्याय केला, असा प्रचार करतात. त्यामुळे या आघाड्या किती कामाच्या? हे तुम्हाला (बावनकुळेंना) नंतर कळेल.

हेही वाचा >>> सांगली भाजपमध्ये प्रस्थापितांकडून नवीन पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न

गडकरी यांनी आगामी काळात तिकीट वाटप करताना येणाऱ्या अडचणींकडेही बावनकुळेंचे लक्ष वेधले. तीन पक्षाच्या युतीत भाजपला किती जागा मिळेल हेच ठरले नाही, मग किती लोकांना ‘लॉलीपॉप’ द्यायचे. एक वेळ ‘लॉलीपॉप’ संपेल पण मागणाऱ्यांची संख्या कमी होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

गडकरींनी कार्यकर्ते व नेत्यांनाही बोधामृत पाजले. “प्रत्येकाला काही ना काही हवे असते, पण पक्षाला सर्वांनाच सर्व काही देता येत नाही.” असे सांगून कार्यकर्त्यांना समाधानी राहण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर नेत्यांनीही कार्यकर्त्यांना विसरू नये कारण त्यांच्याच जोरावर पक्षाची वाटचाल सुरू असते हे विसरू नका,असेही बजावले. सामान्यपणे राजकारणात नेते गोड बोलून सत्य लपवतात.पण गडकरी यांनी पडद्याआडचे सर्वच सत्य उघड केले. त्यामुळे त्यांचे भाषण सध्या भाजपमध्ये चांगलेच चर्चेत आहे.