नाशिक : दिंडोरी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. बागलाण या आदिवासी राखीव मतदार संघातून त्यांनी तयारी सुरु केल्याने भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्या गोटात अस्वस्थता आहे. बागलाणच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये विद्यमान आमदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

देशात सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यातबंदीचा फटका भाजपला बसला. राष्ट्रवादीकडून (शरद पवार) भास्कर भगरे या नवख्या उमेदवाराने तत्कालीन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत डॉ. पवार यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न होत आहेत. बागलाण हा आदिवासी राखीव विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या धुळे मतदार संघात येतो. डॉ. पवार यांचे सासरे तथा माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या जुन्या कळवण मतदारसंघातील काही गावे बागलाण तालुक्यात आहेत. या आधारावर डॉ. पवार यांनी या ठिकाणी तयारी चालविल्याचे सांगितले जाते. सध्या ही जागा भाजपच्या ताब्यात असून दिलीप बोरसे हे प्रतिनिधीत्व करतात. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी एकसंघ राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार दीपिका चव्हाण यांचा ३५ हजार मताधिक्याने पराभव केला होता.

आणखी वाचा-Maharashtra Election 2024: काँग्रेसमध्ये उमरखेडसाठी सर्वाधिक इच्छुक, दिग्रसमध्ये केवळ दोन!

डॉ. भारती पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्यामुळे आमदार बोरसेंनी अन्य पर्याय चाचपडण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली होती. मात्र बोरसेंनी त्यास नकार दिला. चार दशकांपासून आपण काँग्रेस, राष्ट्रवादी, माकपशी लढणारे कार्यकर्ते आहोत. त्या विचारसरणीच्या विरोधात आपला डीएनए असल्याचे मतदारसंघाला ज्ञात असल्याचे ते सांगतात. भाजपच्या तिकीटावर लढण्यापूर्वी बोरसे हे १९९५ मध्ये अपक्ष निवडून आले होते. मतदारसंघात जातीय समीकरणे प्रभावी ठरतात. या ठिकाणी ९० हजार मते भिल्ल समाजाची तर, २८ हजार मते कोकणा समाजाची आहेत. उमेदवार निवडीत राजकीय पक्षांना त्याचा विचार क्रमप्राप्त ठरतो. आमदार बोरसे हे भिल्ल समाजाचे असून डॉ. पवार या कोकणा समाजाच्या आहेत.

विद्यमान आमदाराला डावलून डॉ. पवार यांना संधी दिल्यास स्थानिक-बाहेरील हा वाद निर्माण होण्याची भाजप पदाधिकाऱ्यांना भीती आहे. शिवाय, खासदार, केंद्रीय मंत्री राहिलेल्या व्यक्तीने विधानसभा लढविल्यास पक्षीय पातळीवर वेगळा संदेश जाण्याचेही पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

आणखी वाचा-Maharashtra Election 2024 : यवतमाळमध्ये महायुती वर्चस्व कायम राखणार का ?

बागलाण तालुक्यात आजवर अनेकदा गेली आहे. माजीमंत्री ए. टी. पवार यांच्या जुन्या मतदारसंघातील ३८ गावे बागलाण मतदारसंघात आहेत. आजही येथील लोक पवार परिवाराशी जोडलेले आहेत. नातेवाईकही मोठ्या प्रमाणात आहेत. या भागाचे प्रतिनिधित्व करण्याचा स्थानिकांचा नेहमीच आग्रह राहिला आहे. या भागात आरोग्यविषयक सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय मंजुरीची कामे केली आहेत. उमेदवारीबाबत पक्षाचा निर्णय अंतिम राहील. ही जागा भाजपने जिंकणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. -डॉ. भारती पवार (माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री)