भाजपाच्या विरोधात २६ पक्षांची आघाडी केल्यानंतर विरोधकांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू केली आहे. त्याअगोदरच आघाडीतील अनेक प्रादेशिक पक्ष काही महिन्यांत येऊ घातलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहेत. या निवडणुकीतील यश-अपयशावर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न या पक्षांमधून होताना दिसत आहे. समाजवादी पक्षाने मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘इंडिया’ आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्याचा उद्देश दिसत आहे.

‘सपा’प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी माध्यमांसमोर बोलताना धौहनी व चितरंगी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले. उत्तर प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या विंध्य प्रांतातील सिद्दी जिल्ह्यातील हे दोन मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. धौहनीमधून विश्वनाथ सिंह गौड मार्कम आणि चितरंगीसाठी श्रावणकुमार सिंह गौड यांना तिकीट देण्यात आले आहे.

Yogendra Yadav, Bharat Jodo Andolan,
‘भारत जोडो’ आंदोलनातील सहभागी शहरी नक्षलवादी संघटनांची नावे जाहीर करा, योगेंद्र यादव यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
North Nagpur, Atul Khobragade, Employee Pension,
या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sharad Pawar claims that the grand alliance plans are possible but people want change print politics news
महायुतीच्या योजनांचा परिणाम शक्य पण लोकांना बदल हवाच! शरद पवार यांचा दावा
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच

हे वाचा >> ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?

मागच्या बुधवारीच ‘सपा’ने बुंदेलखंड आणि ग्वाल्हेर-चंबळ प्रांतात असलेल्या मेहगाव, भांडेर (अनुसूचित जाती), निवारी व राजनगर या मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली. दोन्ही प्रांत उत्तर प्रदेश सीमेलगत आहेत. वरील सहा मतदारसंघांपैकी काँग्रेसने २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन ठिकाणी विजय मिळवला होता आणि दोन ठिकाणी त्यांचा उमेदवार द्वितीय क्रमाकांवर होता. या सहा मतदारसंघांत ‘सपा’कडून काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना एक प्रकारे आव्हान दिले जाईल. तसेच ‘सपा’ आणखी जागा लढविण्यास इच्छुक आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेससह आघाडी करून निवडणूक लढविण्यासंबंधीची शक्यता ‘सपा’चे प्रदेशाध्यक्ष रामायण सिंह पटेल यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, “कोणत्याही राज्यात आघाडी करण्यासंबंधीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय स्तरावरचे नेते घेत असतात. मात्र, सध्या तरी आम्हाला मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी अशी आघाडी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही”, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढविण्याची ‘सपा’ने घोषणा केली आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये घोसी या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने माघार घेतली असून, आपला पाठिंबा सपाच्या उमेदवाराला दिला आहे. अशा प्रकारे अधिकृत पत्रक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी शनिवारी काढले. फक्त मध्य प्रदेशच नाही, तर ‘सपा’ने उत्तराखंडच्या पोटनिवडणुकीतही शिरकाव केला आहे. बागेश्वर पोटनिवडणुकीत ‘सपा’कडून उमेदवार देण्यात आला आहे. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपा, असा स्पष्ट सामना आहे.

हे वाचा >> ‘इंडिया’ आघाडीत विसंगती; एकजूट भाजपाविरोधात, पण लढाई एकमेकांविरोधात

मध्य प्रदेशातील समाजवादी पक्ष

२०१८ सालच्या निवडणुकीत राजनगर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराने ७९२ मतांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला २३,७८३ एवढे मतदान झाले होते; तर निवारी मतदारसंघात ‘सपा’चा उमेदवर द्वितीय क्रमाकांवर होता. अखिलेश यादव यांच्या पक्षाची सध्याची भूमिका ही त्यांच्या स्वतःच्याच विधानाशी विसंगती दर्शविणारी आहे. काही दिवसांपूर्वीच यादव म्हणाले होते की, ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष भाजपाविरोधात लढण्यास सक्षम आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसने त्या पक्षाला पाठिंबा द्यावा. मात्र, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस हा भाजपाविरोधातील एक मजबूत पक्ष असताना ‘सपा’ने फारशी ताकद नसतानाही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

सपा प्रदेशाध्यक्ष रामायण सिंह पटेल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले की, अखिलेश यादव यांनी आम्हाला संबंध राज्यभरात निवडणूक लढविण्याचा आदेश दिला आहे. इतर मतदारसंघांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यांची यादी केंद्रीय नेतृत्वाला पाठविण्यात आली आहे. राहिला प्रश्न ‘इंडिया’ आघाडीचा; तर ही आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीशी त्याचा काहीही संबंध नसून, ‘सपा’ पक्ष कुठेही निवडणूक लढविण्यास स्वतंत्र आहे. पटेल पुढे म्हणाले की, अखिलेश यादव यांनी जुलै महिन्यात लखनऊ येथे मध्य प्रदेशच्या कार्यकारिणीशी संवाद साधला होता. त्या बैठकीत त्यांनी मध्य प्रदेशमधील आतापर्यंतची सर्वांत चांगली कामगिरी या निवडणुकीत करून दाखवा, अशी सूचना आम्हाला दिली.

मध्य प्रदेशमध्ये जातिनिहाय जनगणना व्हावी, बेरोजगार युवकांना महिन्याला तीन हजारहून अधिकचा भत्ता मिळावा, तसेच व्यावसायिक कर्जाची हमी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन, अशा काही योजना घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत आणि आमच्या पक्षाचा प्रचार करणार आहोत.

आणखी वाचा >> वंचित बहुजन आघाडी ‘इंडिया’चे गणित बिघडवणार?

समाजवादी पक्षाने आतापर्यंत २००३ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चांगली कामगिरी केली होती. या निवडणुकीत सात आमदार निवडून आले होते. त्यावेळी पक्षाचे संस्थापक उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री होते. २०१८ साली ‘सपा’ने छत्रपूर जिल्ह्यातील बिजावर विधानसभा मतदारसंघात भाजपाचा पराभव करून ही एकमेव जागा जिंकली होती. काँग्रेस पक्ष या ठिकाणी तिसऱ्या स्थानावर राहिला. मात्र, कालांतराने बिजावरचे आमदार यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली, त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

२००८ साली ‘सपा’च्या निवारी मतदारसंघातून मीरा दीपक यादव जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीमध्येही त्या नेतृत्व करणार आहेत. २०१३ साली ‘सपा’ला एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही.

काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रवक्ते के. के. मिश्रा यांनी सांगितले की, मध्य प्रदेशमध्ये ‘सपा’चा फारसा प्रभाव नाही. उलट काँग्रेसची भाजपाशी थेट लढत आहे. इंडिया आघाडी २०२४ साठी स्थापन झाली आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष मध्य प्रदेशमध्ये निवडणूक लढवू इच्छित असेल, तर त्याला काँग्रेसची हरकत नाही. फक्त त्यांनी भाजपाला पाठिंबा देऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.

२०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २३० सदस्यांच्या विधानसभेत सर्वाधिक ११४ जागा जिंकल्या होत्या; तर भाजपाला १०९ जागांवर समाधान मानावे लागले होते. समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व अपक्षांची मदत घेऊन काँग्रेसने कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यानंतर १५ महिन्यांतच विद्यमान केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक गट काँग्रेसमधून बाहेर पडला आणि भाजपाला जाऊन मिळाला. त्यामुळे काँग्रेसचे सरकार गडगडले. मार्च २०२० साली भाजपाने पुन्हा सत्ता स्थापन केली आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.