दयानंद लिपारे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने एकेका मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात दिसले. पन्हाळा – शाहूवाडी या विधानसभा मतदारसंघातील कार्यक्रमात आघाडीच्या उमेदवाराशी पाठिशी राहिले पाहिजे; यापुढे फिक्सिंग चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र आघाडीचा मुख्य घटक असलेल्या काँग्रेसचा समावेश होण्याबाबत निर्णय गुलदस्तात असल्याने आघाडीला मूर्त स्वरूप कसे येणार हा प्रश्न उरतोच.

हेही वाचा… शिक्षक परिषदेने आमदार नागो गाणारांची उमेदवारी जाहीर केल्याने नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपची कोंडी

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आले. त्यानंतर आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचे सुतोवाच काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून केले जात आहे. आघाडी अंतर्गत पक्षांचे मतैक्य घडवण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात केला.

हेही वाचा… अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा ‘मशाली’; शिवसेनेचे चिन्ह पोहचविण्याच्या तयारीचा असाही योगायोग

कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी त्यांच्या गावात बांधलेल्या ग्रामपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते व माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत झाले. प्रास्ताविकात आसुर्लेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पन्हाळा तालुक्यात ताकत पुरवली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटले नाहीत, असे म्हणत त्यांनी आपला रोख भाजपला पाठिंबा दिलेले जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या दिशेने वळवत पुढील भाषणांचा रोख विधानसभा निवडणुकीच्या दिशेने वळवला .

हेही वाचा… केवळ धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यासाठी शिंदे गटाकडून अंधेरी पूर्व निवडणुकीचे कारण पुढे?

विधानसभा जिंकण्याचा सल्ला

शाहूवाडी -पन्हाळा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील हे आघाडीचे उमेदवार असतील असे दिसत आहे. या कार्यक्रमास उपस्थित सत्यजित पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष मानसिंग गायकवाड, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर या मतदारसंघातील तिन्ही स्थानिक नेत्यांनी तिघांनी एकत्र राहावे आणि जिल्ह्यातील नेत्यांनी पाठबळ दिले तरच एकेक जागा जिंकणे शक्य आहे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला. कोरे विरोधात सर्वांनी मोट बांधून विजय मिळवण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा… Maharashtra News Live : शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह, राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र, राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

स्थानिक राजकारणाचे साटेलोटे

तथापि जिल्ह्यातील नेत्यांचे साटेलोटे पाहता असे घडणार का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्ह्याच्या सहकार व स्थानिक पातळीवरील राजकारणात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची विनय कोरे यांच्याशी हात मिळवणी असते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी संचालक असतानाही आसुर्लेकर यांना दूर ठेवले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आता विनय कोरे विरोधात लढताना खरेच मदत करणार का,अशी शंका शाहूवाडी – पन्हाळ्यातील महाविकास आघाडीच्या स्थानिक नेतृत्वाने अजित पवार यांच्याशी खासगीत कथन केल्याचेही सांगण्यात येते. त्यातूनच पवार यांनी फिक्सिंग चालणार नाही, असा कानमंत्र दिला हे उघड आहे.

हेही वाचा… विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

हेही वाचा… विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

काँग्रेसच्या मदतीचे काय?

पवार यांच्या सल्ल्यानुसार मुश्रीफ यांनी शाहूवाडी मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारास मदत पुरवली तरी काँग्रेसच्या मदतीचे काय? हा प्रश्न उरतोच. आसुर्लेकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांना निमंत्रित केलेले नव्हते. सतेज पाटील – कोरे यांच्या चर्चेतूनच करण गायकवाड व अमर पाटील या माजी आमदारपुत्रांना ( ज्यांनी पूर्वी विधानसभा निवडणूकही लढवली होती) गोकुळ दुध संघात संचालक होण्याची संधी मिळाली. या दोन्ही तरुणांचे पूर्वीचे बळ उरले नसले तरी काही हजार मतांचा गठ्ठा राखून आहेत. त्यांचे पाठबळ आणि स्वतःची ताकद या आधारे कोरे निवडणुकांमध्ये पुन्हा बाजी मारू शकतात. सतेज पाटील यांना गोकुळ, जिल्हा बँक, जिल्हा परिषद अशा स्थानिक राजकीय – सहकार क्षेत्रात प्रभाव टिकवण्यासाठी विनय कोरे यांची साथ हवीच असते. त्यामुळे सतेज पाटील यांचा इशारा मिळाल्याशिवाय करण गायकवाड, अमर पाटील हे आघाडीच्या बाजूने प्रचारात जातील अशी शक्यता दृष्टीपथात नाही. आणि काँग्रेसचे पाठबळ नसेल तर आघाडीचे विजयाचे सूत्र प्रत्यक्षात कसे उतरणार याचे उत्तर नाही. पवार यांच्या कार्यक्रमास उपस्थित असणारे सत्यजित पाटील, मानसिंग गायकवाड, बाबासाहेब पाटील यांच्या ताकदीवर पन्हाळगडावर विजयाचा झेंडा फडकावणे तितकेसे सोपे नाही. त्यामुळे अजित पवार यांनी फिक्सिंग चालणार नाही असे सांगितले असले तरी काँग्रेसचे मनापासून मिक्सिंग होणार नाही तोवर विजय हाताशी कसा लागणार, याचे उत्तर सत्तेचे वेध लागलेल्या आघाडीच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाला शोधावे लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unity in alliance is the major challenge for ajit pawar in panhala shahuwadi assembly election print politics news asj