लक्ष्मण राऊत, लोकसत्ता
जालना : दोन वेळेस विधानसभेची आणि त्यानंतर सलग पाच वेळेस जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते रावसाहेब दानवे यांच्या पराभवामागे राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील अनेक कारणे आहेत. त्यांच्या विरोधात निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील कोणते मुद्दे आपल्या विजयासाठी कारणीभूत ठरू शकतात याचा अंदाज घेऊन प्रचारासाठी मतदारांचा नेमका वर्ग निश्चित केला होता.
‘अब की बार चारसो पार’ अशी घोषणा देणाऱ्या भाजपला संविधानात बदल करायचा आहे, अशी भावना मागासवर्गीय आणि अन्य मतदारांत निर्माण झाली होती. त्याचा प्रचार करून ही मते काँग्रेसच्या भोवती अधिक संघटित करण्याचा प्रयत्न काळे आणि त्यांच्या समर्थकांकडून झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी केलेल्या हिंदुत्वाच्या संदर्भात वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात केंद्र सरकारच्या विरोधात भावना निर्माण झाल्याचे पाहून काळे यांनी या मतदारांशी अधिक संपर्क साधला. हा मतदार भाजपला मतदान करणार नाही याची जाणीव असल्याने काळे यांनी प्रचारात मुस्लिम समाजावर मतांसाठी लक्ष्य केंद्रित केले होते.
आणखी वाचा-कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला?
त्याचप्रमाणे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या जालना जिल्ह्यात या मतांच्या अनुषंगानेही काळे यांचे प्रारंभापासून प्रयत्न होते. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात आणि काळे यांच्या बाजूने भूमिका घेतली. मराठा मतांच्या संदर्भात या भूमिकेचा आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना पडलेल्या जवळपास दीड लाख मतांचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दानवे यांना बसला. केंद्र सरकारने मुस्लिम समाजाच्या संदर्भात घेतलेले निर्णय आणि त्या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची वक्तव्ये, चारसो पारच्या घोषणेमुळे देशभर झालेली संविधान बदलाची चर्चा आणि जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने केलेल्या मागण्यांची पूर्तता या तिन्हीही बाबी पक्षीय पातळीवरील होत्या. त्या संदर्भातील निर्णयांशी दानवे यांचा वैयक्तिक संबंध नव्हता. परंतु हे तिन्हीही विषय दानवेंच्या विरोधात आणि कोणत्याही कष्टाविना काँग्रेसचे उमेदवार काळे यांच्या पथ्यावर पडले. यामुळे दानवे यांचा मदारसंघातील विकासाचा मुद्दा मागे पडला.
आणखी वाचा-निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम बंगाल भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कारण काय?
मतदारसंघातील विकासकामांची मोठी जंत्री दानवे यांनी प्रचारात आणली होती. काळे यांनी प्रचारात दानवे यांच्या विकासाच्या मुद्याला खोडून काढण्यावर भर दिला होता. भाजपच्या तुलनेत मतदारसंघातील काँग्रेसची संघटनात्मक आणि बूथ मॅनेजमेंटची व्यवस्था कमकुवत होती. परंतु महाविकास आघाडीच्या पाठीशी असलेले दलित, मुस्लिम आणि मराठा समाजातील मोठ्या प्रमाणावरील मतदारांपुढे भाजपचे तीन-चार वर्षांचे नियोजन निष्फळ ठरले. मागील दहा वर्षांत सत्तेमुळे दानवे यांच्याभोवती ‘अर्थ’पूर्ण राजकारण करणाऱ्यांचा वर्ग जमा झाला होता. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील अशा कार्यकर्त्यांमुळेही दानवे यांच्या प्रत्यक्ष जनसंपर्कात फरक पडला होता. जालना शहरातील मूठभर धनदांडग्या मंडळींसोबत ऊठ-बस म्हणजे जनसंपर्क नव्हे, असा प्रचार काळे यांच्या समर्थकांनी खासगी बैठकीत केला आणि त्याची चर्चाही झाली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अशी महत्त्वाची पदे मिळाल्यावर दानवे यांचा वेळ मतदारसंघाच्या बाहेरही गेला. शिवाय दानवे यांनी एखाद्या विषयात घेतलेली भूमिका योग्य वाटत नसेल तर तसे त्यांना अप्रत्यक्षरीत्या सांगावे असे एखाद्या हितचिंतकास वाटले, तसे वातावरण त्यांच्या भोवतीच्या कोंडाळ्यात राहिले नव्हते.
लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) असले तरी त्यापैकी एकाही ठिकाणी दानवे यांना मताधिक्य मिळाले नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत नसल्याचा मोठा फटकाही दानवे यांना बसला. विशेष म्हणजे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्व ओळखून या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवण्यात कोणतीही कसूर ठेवली नव्हती.