नागपूर : राज्यात सत्तेत येऊन वर्षभराचा काळ लोटला तरी विविध महामंडळांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नाहीत, मंत्रालयाशी संबंधित कामे होत नाहीत आणि दुसरीकडे संघटनेत नव्याने आलेल्यांना महत्त्वाची पदे दिली जातात. यामुळे भारतीय जनता पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असून काहींनी ती वरिष्ठांकडे बोलूनही दाखवली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली. महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना देण्यात आले. मात्र हे सर्व करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्षात कोणी ऐकून घेत नाही, अशी भावना पक्षात वाढीस लागली आहे. पक्षाने अलीकडच्या काळात केलेल्या नियुक्त्याही याला कारणीभूत ठरल्या आहेत. काही मंडळ अध्यक्षांना विधानसभा निवडणूक प्रमुख न करता इतरांना संधी देण्यात आली. त्याची नाराजी अधिक आहे. जे नेते निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यानांच निवडणूक प्रमुख केल्याने ते नाराज आहेत. शहरात विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकारिणी अजूनही जाहीर केली नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघासह दक्षिण आणि मध्य व पूर्व नागपुरात हेच चित्र आहे.
उत्तर नागपुरातील कार्यकर्ता मेळाव्यात ही बाब समोर आली. पक्षात मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू आहे. नव्याने आलेल्यांना संघटनेत जबाबदाऱ्या दिल्या जात आहे. त्यामुळे जुने कार्यकर्ते उदासीन आहेत. महामंडळांवर नियुक्त्या नाहीत, मंत्रालयात कामे होत नाहीत. अशा स्थितीत नवीन कार्यकर्ते जोडायचे कसे? असा त्यांचा सवाल आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकांसाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक आहेत, पण त्यांना त्यांच्या उमेदवारीबाबत आश्वस्थ केले जात नाही. त्यामुळे त्यांचा उत्साह मावळत चालला आहे. अशा नाराजांनी त्यांचा वेगळा गट करणे सुरू केले आहे. याची दखल पक्षातील वरिष्ठांनी घ्यावी, अशी मागणी आता कार्यकर्ते उघडपणे करू लागले आहे.
“राज्य किंवा केंद्र सरकारकडून नियुक्त्या करताना पदाधिकाऱ्यांचा विचार केला जातो. पक्षातंर्गत कुठेही नाराजी नाही. भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ता पक्ष सोडून गेला असे दिसणार नाही. उलट पक्षामध्ये बाहेरील पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत. काही कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात. अपेक्षा ठेवणे वाईट नाही. ते नाराज असतील तरी योग्य वेळी त्यांना कुठेना कुठे स्थान मिळेल.” -गिरीश व्यास, माजी आमदार