प्रशांत देशमुख
वर्धा : एकमेकांविरोधात राजकारण करण्याचा इतिहास असलेल्या तीन पक्षांना एकत्र आणण्याचे श्रेय आता माजी मंत्री सुनील केदार व माजी खासदार सुबोध मोहिते यांना द्यावे लागेल. तसे हे दोघेही जिल्ह्याबाहेरचे. राजकीय भाषेत उपरे किंवा पार्सल. पण, आज यांच्याभोवती राजकीय सूत्र फिरू लागले आहे. कारण चर्चेत या दोघांची नावे येत्या लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून घेतली जात आहेत.
आमचे घर आम्हीच सांभाळणार, बाहेरच्यांचे काय काम? आजवर आम्हीच नाही का पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला. आता आमचे नेते आम्ही सक्षम नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगतात, अशा भावना महाविकास आघाडीतील तीनही पक्षनेत्यांच्या झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरेंच्या गटातील नेत्यांना आजवर घेतलेल्या श्रमावर पाणी फिरत असल्याची जाणीव झाली आहे. किंबहुना, केदार व मोहिते यांनी ती करून दिली. यांनी स्वत: मात्र उघडपणे संभाव्य दावेदारी व्यक्त केलेली नाही. पण यांचा जिल्ह्यातील वाढता राबता वेगळीच दिशा दाखवणारा ठरला. आपल्याला डावलून बाहेरच्यांना उमेदवारी मिळणार म्हणून अस्वस्थ झालेले या दोघांच्याच नावे बोटं मोडत आहेत.
हेही वाचा… प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’ची भाजपला अप्रत्यक्ष मदत; चिंचवडमध्ये मतविभाजनाचा महाविकास आघाडीला फटका
जिल्ह्यास बाहेरचा उमेदवार ही बाब नवी नाही. यापूर्वी कमलनयन बजाज व वसंतराव साठे यांनी लोकसभा निवडणुकीत स्थानिकांवर मात करीत उमेदवारी आणली. साठेंना तर बाहेरचे असूनही स्थानिकांनी तीन वेळा निवडून दिले. तेव्हा स्थानिक नेते सक्षम नसल्यानेच बाहेरच्यांना लादल्याची पक्षश्रेष्ठींची भावना होती का, हे कोडेच राहिले. जनतेची निष्ठा पक्षांप्रति की नेत्यांप्रति, हा निष्कर्ष काळानुसार बदलत राहिला आहे. आता त्याचीच परीक्षा पुन्हा घेतली जाणार.
हेही वाचा… सतेज पाटील यांच्यापुढे संघटना बांधणीचे आव्हान
काँग्रेसने आघाडीच्या राजकारणात वर्धा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करीत स्वत:कडेच ठेवला. गतवेळी ‘स्वाभिमानी’ला देणार म्हणून चर्चा झाली. मात्र राव यांच्या कन्या चारुलता उमेदवार झाल्या. त्यांचा पराभव झाला. त्यापूर्वी सागर मेघे पराभूत झाले. सलग दोन वेळा पराभव पाहावा लागल्याने हा मतदारसंघ बाहेरचा सक्षम उमेदवार शोधून लढवण्याचा पक्षश्रेष्ठींचा मनसुबा तर नाही ना, अशी शंका केदारांच्या चर्चेमुळे उपस्थित होते. तसेच दोनदा पराभव झाल्याने अदलाबदलीत वर्धा अन्य पक्षाकडे जाणार, ही एक शंका. त्यातूनच राष्ट्रवादीचा गोट भांबावला. मात्र, बाहेरचा उमेदवार नकोच असे या तीनही पक्षांच्या एकत्र येण्याचे सूत्र. लोकसभेची ही जागा किंवा तिकीट कोणास जाणार, हे अद्याप ठरले नसताना गावचाच उमेदवार हवा म्हणून व्यक्त झालेली चिंता सध्या अनाठायीच ठरावी.