मोहनीराज लहाडे
नगर : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांनी शरद पवार यांची पाठराखण केली त्यामध्ये नगर जिल्ह्याचा समावेश होता. त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील परिस्थिती सुधारत गेली. मध्यंतरी युतीच्या काळात काहीशी झळ बसली परंतु ती कसर नंतर राष्ट्रवादीने भरून काढली. एकेकाळी बालेकिल्ला असूनही काँग्रेसला नेहमी राष्ट्रवादीच्या तुलनेत दुय्यम स्थान राहीले. गेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर जिल्ह्यातील मतदारांनी राष्ट्रवादीला चांगलीच साथ दिली. आता लोकसभा निवडणुकीचे वेध लागले तसे नगर जिल्हा राष्ट्रवादीला चांगलेच धक्के बसू लागले पक्षांतर्गत सूप्त वादाचे परिणामही दिसू लागले आहेत. जिल्हा पक्ष संघटनेतील अंतर्गत धूसफूस बाहेर प्रकट होऊ लागली आहे. त्याचे आणखी काही दृश्य परिणाम नजिकच्या काळात दिसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांतील घटना पाहिल्या तर राष्ट्रवादीमध्ये सारेकाही अलबेल आहे, असे मानता येणारे नाही. त्याची सुरुवात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतुन झाली. त्याहीपूर्वी पक्षाचे नगर शहरातील आमदार संग्राम जगताप यांनी शरद पवार यांचा आदेश धुडकावत महापौर पदाच्या निवडणुकीत, राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असतानाही, भाजपला साथ देत महापौर-उपमहापौर अशी दोन्ही पदे बहाल केली. त्यानंतर आमदार जगताप व त्यांच्या १९ समर्थक नगरसेवकांची तात्पुरती पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र नंतर लगेचच त्यांना पुन्हा सन्मानपूर्वक पक्षात घेण्यात आले. पक्षाची हतबलता तेथे उघड झाली. पक्षहिताला बाधा आणत स्वार्थासाठी स्थानिक पातळीवर काहीही आणि कशाही तडजोडी केल्या तरी त्या क्षम्य ठराव्यात, असा संदेश त्यावेळी त्या घटनेतून गेला होता. एक परिणाम असाही दिसला की आमदार जगताप पितापुत्रांना जिल्हा बँकेतील उमेदवारीपासून वंचित रहावे लागले.
हेही वाचा… जमाखर्च : तानाजी सावंत, एक रिंगण वादाचे, दुसरे बलवानपणाचे!
जिल्हा बँकेवर अजित पवार-बाळासाहेब थोरात यांचे पूर्ण वर्चस्व होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील नियोजनासाठी दोघांनी लक्ष घातले होते. राज्यात सत्ताबदल झालेला होता. पवार-थोरात गाफील राहीले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची पाच मते फुटली. बँकेचे राष्ट्रवादीकडील अध्यक्षपद भाजपकडे खेचण्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांना यश आले. मात्र दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्ष पातळीवर त्याची विशेष दखल घेतली गेल्याचे दिसून आले नाही. काही केले तरी चालू शकते, हा संदेश पुन्हा एकदा गेला. त्यातून पक्षातील अस्वस्थता प्रकट होऊ लागली. जिल्हा बँक अध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार चंद्रशेखर घुले यांचे समर्थक, युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. घुले विधान परिषदेसाठी इच्छुक उमेदवार होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने विधान परिषदही नाही आणि जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही नाही, तेलही गेले आणि तूपही गेले, अशी त्यांची अवस्था झाली. त्यामुळे त्यांनी पाथर्डी-शेवगाव मतदार विधानसभा मतदारसंघावर आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यातून पक्षाचे तेथील दावेदार प्रताप ढाकणे अस्वस्थ झाले आहेत.
हेही वाचा… मुंडे भाऊ-बहिणीचा ‘सहकार’, कार्यकर्त्यांची मात्र कोंडी
जिल्हा बँकेतील फटाफुटीचा परिणाम कर्जत-जामखेडमधील बाजार समितीच्या निवडणुकीवर झाला. त्यातून पक्षाचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला. हा धक्का जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या समर्थकांच्या माध्यमातून दिला गेल्याचा समज पसरला. त्याला आमदार रोहित पवार-जिल्हाध्यक्ष फाळके यांच्यातील सूप्त वादाची किनार लाभलेली आहे. या वादातून फाळके यांच्या निवासस्थानाला काळे फासून आणि त्यावर ‘गद्दार’ अशी शेरेबाजी लिहण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेली. हे करणारे आमदार रोहित पवार समर्थक होते, हे लपून राहीले नाही. याही घटनेची कोणतीही दखल पक्ष पातळीवर घेतली गेली नाही. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील भाकरी फिरवण्यातून खालच्या स्तरावरील अस्वस्थेकडे दुर्लक्ष झालेले आहे.
हेही वाचा… जमाखर्च : दादा भुसे; ना खात्याचा प्रभाव, मतदारसंघातच व्यस्त
तत्पूर्वी पक्षाने शरद पवार यांच्या उपस्थितीत, मुंबईतील बैठकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी चाचपणी केली. त्यामध्ये आमदार निलेश लंके, माजी आमदार अरूण जगताप व दादा कळमकर, जिल्हाध्यक्ष फाळके व घनश्याम शेलार यांची नावे समोर आली. जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पाया प्रामुख्याने साखर कारखानदारीच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. सहाजिकच शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाच हे कारखानदार दाद देतात, इतरांना जुमानत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यातून आमदार लंके यांचे पक्षात वाढलेले महत्व, पवारांशी असलेली जवळीक अनेकांना खुपते आहे.
हेही वाचा… ‘मावळ’ लोकसभा मतदारसंघात रायगडचा उमेदवार? भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली सुरू
अशातच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी जिल्हा बँकेतील फुटीरांवर कारवाई झाली नाही, जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांची लूट करत आहे याकडे वरिष्ठांची लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जात आहे, पक्षात बेईमानांची चलती झाली आहे, असे आरोप करत राष्ट्रवादीचा त्याग केला व ‘भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या आरोपांचा रोख पक्षाच्या जिल्ह्यातीलच नेत्यांकडे होता. शेलार यांना गेल्यावेळच्या श्रीगोंदा-नगर विधानसभा निवडणुकीत पक्षाने ऐनवेळी उमेदवारी देऊनही त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची लक्षणीय मते मिळवली होती, थोड्या मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. राष्ट्रवादीचा एक मोहरा गळाला याची कोणतीही प्रतिक्रिया पक्षाच्या पातळीवर उमटली नाही. तेलंगणातील केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने जिल्ह्यात पक्ष बांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीतीलच आणखी काही मोहरे ‘बीआरएस’च्या गळाला लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपविरोधी चळवळीतील, विशेषतः शेतकरी चळवळीतील पदाधिकारी ‘बीआरएस’च्या संपर्कात जाण्याची शक्यता आहे, त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार आहे.