प्रदीप नणंदकर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारची सत्ता अचानकपणे संपुष्टात येईल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्यानीमनीही नव्हते. मात्र, आता सत्ता हातची गेल्यामुळे या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जिल्ह्यात प्रचंड अस्वस्थता आहे. लातूर जिल्ह्यातील काँग्रेसची सत्ता आता लातूर शहर व ग्रामीण मतदार संघापुरती मर्यादित झाली आहे.
लातूर शहर मतदारसंघातून विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र अमित देशमुख हे तिसऱ्यांदा, तर कनिष्ठ सुपुत्र लातूर ग्रामीणमधून पहिल्यांदा निवडून आले. महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर अमित देशमुख यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले, वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य हे चांगले खातेदेखील मिळाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात अहमदपूर व उदगीर हे दोन मतदारसंघ. या वेळी दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीने विजय मिळवत १०० टक्के यश प्राप्त केले. त्यात उदगीर विधानसभा मतदारसंघातून जो भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता त्यात संजय बनसोडे हे पहिल्यांदाच विजयी झाले व त्यांना राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. मंत्रिपद मिळाल्यानंतर बनसोडे हे कार्यकर्ते असल्याने त्यांनी या मंत्रिपदाचा आपल्या मतदारसंघासाठी पुरेपूर वापर करत भरपूर निधी आणला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करत संजय बनसोडे यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. कार्यकर्त्यांना बळ देणारा व लोकांत मिसळणारा मंत्री अशी त्यांची ओळख बनली. करोनाच्या काळातही ही प्रतिमा त्यांनी जपली. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्याही अपेक्षा वाढलेल्या होत्या. अहमदपूर मतदारसंघातून निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे सिद्धी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांमध्ये सतत संपर्कात होते. ते कसलेले राजकारणी, त्यांना अचानक सत्ता जाईल असे वाटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे.
लातूर शहर व ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचा वरचष्मा कायमच राहिला आहे. विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र एकाच वेळी निवडून आल्याने देशमुख समर्थक आनंदात होते. मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लागतील याच्या अपेक्षा कार्यकर्त्यांच्या मनात होत्या . आघाडी सरकार हे किमान पाच वर्ष टिकेल असे सर्वांनाच वाटले होते. शिवसेनेत अशी उभी फूट पडेल व सरकार पडेल हे कार्यकर्त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. फडणवीस सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अस्वस्थ होते, त्यांना संधी मिळत नव्हती. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. आता पुन्हा हातची सत्ता गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार राज्यात असल्यामुळे त्याचा लाभ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होईल असा कार्यकर्त्यांचा होरा होता. आता सारे हताश आहेत. पुनर्बांधणीसाठी काँग्रेसने अद्यापि कार्यक्रम जाहीर केलेला नाही.