मोहन अटाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू होऊन एक वर्षाचा कालावधी होत असताना निवडणूक लांबल्‍याने निवडणुकीसाठी इच्‍छुकांची प्रचंड कोंडी झाली आहे. निवडणूक नेमकी कधी होणार, याची स्‍पष्‍टता नसल्‍याने ‘तयारीही करता येईना आणि शांत बसता येईना’ अशी अवस्‍था इच्‍छुकांची झाली आहे. प्रथमच निवडणूकीची तयारी करणाऱ्यांनी सुरूवातीला हात सैल सोडले, परंतु आता निवडणूक लांबत चालल्‍याने तसेच खर्चही परवडत नसल्‍याने त्‍यांचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.

अमरावती महापालिकेसह राज्‍यातील अनेक महापालिकांच्‍या निवडणुका रखडल्‍या आहेत. अमरावती महापालिकेची मुदत संपल्‍यामुळे ९ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट सुरू झाली. माजी नगरसेवकांसह इच्‍छुक उमेदवारांनी जोरदार पेरणी सुरू केली होती. पण, निवडणुकीचे अद्यापही संकेत मिळाले नसल्‍याने कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत.

हेही वाचा… शिवसेनेच्या पूर्वीच्या प्रभावक्षेत्रात आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद

महापालिकेची मुदत मार्च २०२२ ला संपली. निर्धारित कार्यक्रमानुसार त्यानंतरच्या काही दिवसांत आगामी निवडणुका होणे अपेक्षित होते. तथापि, वेगवेगळ्या कारणास्तव गेल्या ११ महिन्यांत या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आणखी किती दिवसांनी निवडणुका होतील, याविषयी खात्रीने काहीही सांगता येत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांचे कामकाज तूर्त थंडावले आहे. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याशिवाय खास निवडणुकांसाठी म्हणून कोणतेही उपक्रम, अभियान राबवण्याच्या मानसिकतेत स्थानिक राजकीय नेते नाहीत.

हेही वाचा… वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचे स्थान अधिक पक्के

महापालिकेच्या निवडणुका तीन सदस्यीय की चार सदस्यीय प्रभागपद्धतीनुसार, ओबीसी आरक्षणांचे काय, असे अनेक मुद्दे राजकीय पक्षांना भंडावत आहेत. तथापि, त्यावर सध्यातरी ठोस उत्तर कोणाकडे नाही. महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणे महत्त्वाची ठरतात. त्यानुसार, बहुतांश इच्छुक उमेदवार आपआपल्या उमेदवारीबाबतचा निर्णय घेत असतात. सध्या काहीच स्पष्ट नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे. निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार मिळावेत, यासाठी विविध पक्षांच्या नेत्यांचे कसून प्रयत्न सुरू आहेत. सध्याच्या संभ्रमावस्थेमुळे कोणत्या पक्षाकडे उमेदवारीसाठी जायचे, असा प्रश्न उमेदवारांसमोरही आहे.

हेही वाचा… बाळासाहेब थोरात यांना पक्षाचे बळ

भाजपची धडपड

सहा वर्षांपुर्वी झालेल्‍या महापालिकेच्‍या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाली खेचून अमरावती महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने झेंडा फडकवला होता. भाजपने ८७ पैकी ४५ जागा जिंकत निर्भेळ बहुमत प्राप्‍त केले होते. भाजपने दोन अमरावतीकर नेत्‍यांना राज्यसभा आणि विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन वातावरण निर्मिती करण्‍याचा प्रयत्न केला. महापालिकेत सत्ता टिकवून ठेवण्याचे आव्हान आता भाजपसमोर आहे. विधान परिषद सदस्‍य श्रीकांत भारतीय हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटचे मानले जातात. भाजपच्या प्रदेश पातळीवरील राजकारणात आजवर पडद्याआड राहून काम करणाऱ्या श्रीकांत भारतीय यांच्यावर भाजपने निवडणूक प्रदेश संयोजक म्‍हणून जबाबदारी सोपवली आहे, त्‍याचा कितपत लाभ भविष्‍यात होतो, याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष राहणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unrest among the candidates aspirants due to the delayed of amravati municipal corporation elections print politics news asj