उत्तर प्रदेशामधील जौनपूर मतदारसंघातून माजी खासदार धनंजय सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करीत याबाबत माहिती दिली. मात्र, त्यांच्या घोषणेच्या पाच दिवसांनंतर त्यांना अपहरण प्रकरणात दोषी ठरविण्यात आले. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चाही रंगू लागल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे भाजपाने जौनपूर मतदारसंघात कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. कृपाशंकर सिंह हे महाराष्ट्रात महत्त्वाचे नेते मानले जातात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना ते मंत्री होते. मात्र, २०२१ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना आता उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Loksabha Election 2024 : मतांच्या जोगव्यासाठी राजकीय पक्षांचे स्त्रीदाक्षिण्य
खरे तर जौनपूर हे कृपाशंकर सिंह आणि धनंजय सिंह या दोघांचे पिढीजात गाव आहे. जौनपूरमध्ये मतदारांची संख्या जवळपास १९ लाख इतकी आहे. त्यापैकी बहुसंख्य ओबीसी आहेत. शिवाय यादव, ब्राह्मण आणि ठाकूर समाजातील मतदारांची संख्याही बऱ्यापैकी आहे. अद्याप भाजपाव्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाने जौनपूरमध्ये उमेदवार दिलेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे धनंजय सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याच्या पाच दिवसांनंतर म्हणजेच ५ मार्च रोजी जौनपूर न्यायालयाने त्यांना चार वर्षे जुन्या अपहरणाच्या प्रकरणात दोषी ठरविले आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यावरही शंका उपस्थित केली जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे धनंजय सिंह यांच्या आशेवर पाणी फिरल्याची चर्चा आहे.
गुन्हेगारी विश्वातील एक चेहरा ते उत्तर प्रदेशामधील राजकारणी, अशी ओळख असलेल्या धनंजय सिंह यांच्यावर जौनपूरसह लखनौ आणि दिल्लीतही गुन्हे दाखल आहेत. १९९८ मध्ये धनंजय सिंह यांच्याविरोधात पहिल्यांदा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ते चार महिने फरारही होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
धनंजय सिंह यांनी २००२ व २००७ मध्ये जौनपूरमधील रारी विधानसभा मतदारसंघातून जेडीयूच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांत त्यांचा विजय झाला. मात्र, २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. तसेच बसपाच्या तिकिटावर जौनपूर लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. पण, काही दिवसांत रारी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जारी झाली. त्यानंतर त्यांनी संसदेचे सदस्यत्व सोडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली.
हेही वाचा – प्रताप सिम्हा ते नलिन कटील; भाजपाच्या दुसऱ्या यादीत कर्नाटकातून कोणाला संधी, तर कोणाचा पत्ता कट?
सपा नेते अमरसिंग यांना फोन केल्याच्या मुद्यावरुन मायावती यांनी २०११ मध्ये धनंजय यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर काही दिवसांत त्यांना २०१० सालच्या एका हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. मागील १० वर्षांपासून धनंजय सिंह यांना निवडणूक जिंकता आली नसली तरी ते या ना त्या कारणाने चर्चेत होते. २०१३ मध्ये त्यांना घरातील मोलकरणीच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे याच प्रकरणात त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली होती. त्याशिवाय २०२१ मध्ये मऊ येथील राजकारणी अजित सिंह यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, अपहरण प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्यांना निवडणूक लढविण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोषी ठरविल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. मात्र, उच्च न्यायालयाने जौनपूर न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली, तरच धनंजय सिंह पुन्हा निवडणूक लढू शकतात. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे धनंजय सिंह यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे.