विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीसाठी येत्या ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असल्यामुळे येथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांनी विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले आहे. सत्तेत असताना आमच्याकडे योगी आदित्यनाथ यांची फाईल आली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्हाला संधी होती. मात्र आम्ही तसे केले नाही. सुडाचे राजकारण करू नका, अन्यथा सत्तेत आल्यानंतर आम्हालाही तुमच्यासारखेच वागावे लागेल, असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला.
हेही वाचा>>> स्वत: भाजपाच्या उमेदवार पण सासरेबुवांकडून काँग्रेसचा प्रचार! रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा म्हणाल्या “माझे सासरे…”
प्रक्षोभक, द्वेषणूर्ण भाषण प्रकरणात सपाचे नेते आझम खान यांना दोषी ठरवण्यात आले आहे. याच कारणामळे रामपूर या त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या मतदारसंघात प्रचार करताना अखिलेश यादव गुरुवारी (१ डिसेंबर) रामपूर येथे बोलत होते. यावेळी बोलताना “सध्या सगळीकडे अन्याय होत आहे. मात्र जेव्हा आम्ही सत्तेत होतो, तेव्हा माझ्याकडे योगी आदित्यनाथ यांची एक फाईल आली होती. आदित्यनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई करण्याची मला संधी होती. मात्र मी तसे केले नाही. आम्ही समाजवादी विचाराचे आहोत. मी ती फाईल परत पाठवली. आम्ही द्वेष आणि सुडाचे राजकारण करत नाही. आम्हाला एवढेही कठोर करू नका की, आम्ही सत्तेत आल्यानंतर सध्या तुम्ही जे करत आहात, तेच आम्हीदेखील करू,” असा इशारा अखिलेश यादव यांनी दिला.
हेही वाचा>>> चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध
अखिलेश यादव यांनी ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाची खुली ऑफर दिली. “उत्तर प्रदेशच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सध्या कोणतेही अधिकार नाहीत. मी त्यांना खुली ऑफर देतो. त्यांनी १०० आमदार आणावेत, मी त्यांना आणखी १०० आमदार देतो. या २०० आमदारांना सोबत घेऊन त्यांनी मुख्यमंत्री व्हावे. कोणतेही अधिकार नसतील तर उपमुख्यमंत्रीपदावर राहण्यात काहीही अर्थ नाही,” असे अखिलेश यादव म्हणाले.