उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील मातब्बर नेते, भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या अजय राय यांच्याकडे काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेश संघटन बळकट करण्याचे काम दिले आहे. २०१४ आणि २०१९ साली वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिली होती. त्यानंतर आता पक्षाची कमान सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. देशभर आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपा बळकट होत असताना काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. द इंडियन एक्सप्रेसने अजय राय यांची सविस्तर मुलाखत घेऊन आगामी काळातील त्यांची रणनीती काय असेल? योगी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात ते कसे उभे राहतील? याबाबत माहिती जाणून घेतली. १५ वर्ष भाजपामध्ये राहिलेल्या अजय राय यांनी काँग्रेसला बळकट करण्यासाठीचे त्यांचे नियोजन काय आहे, याबाबत बातचीत केली. द इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकार मलुश्री सेठ यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा संपादित अंश प्रश्नोत्तराच्या स्वरुपात पुढील प्रमाणे…
प्रश्न : लोकसभा निवडणुकीसाठी आता काही महिने उरले आहेत, काँग्रेसला वर आणण्यासाठी काय नियोजन आहे?
काँग्रेसमध्ये प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार जबाबदारी देण्यात आलेली असून त्यानुसार आमचे काम सुरू आहे. जर लोकांना आदर दिला तर ते काँग्रेसमध्ये येऊन काम करण्यास तयार आहेत. आजच एक माजी आमदार, ज्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती, त्यांनी माझी भेट घेतली. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमवेत काम करण्यासाठी अनेक लोक आता इच्छुक आहेत. मी या नेत्यांचा सैनिक म्हणून झटत आहे. काँग्रेस हा एक रंगबिरंगी पुष्पगुच्छ आहे, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि सर्व वयोगटातील नागरिक एकत्र येऊन काम करत आहेत.
प्रश्न : तुमच्या अजेंड्यावर पहिला विषय कोणता?
सर्वात आधी एकच करायचे आहे, ते म्हणजे सरकारशी लढाई. काँग्रेसकडे संघटनात्मक रचना आहेच. संघटनेला घेऊन राज्य सरकारच्या शोषणकारी धोरणाविरोधात आंदोलन करून त्यांना जनतेसमोर उघडे पाडणे, हे आमचे पहिले काम असणार आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, जातीय अत्याचार, दरवाढ या विषयांवर आंदोलनाची मालिका सुरू केली जाणार असून त्यात खंड पडू दिला जाणार नाही.
प्रश्न : नेमक्या कोणत्या मुद्द्यांना तुम्ही उचलून धराल?
बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त उत्तर प्रदेशमधील जनतेसोबत सर्वात मोठा अन्याय केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील मोठमोठी कंत्राटे गुजरातमधील भ्रष्ट कंपन्यांच्या घशात घातले जात आहेत. माझ्याकडे याची उदाहरणे आहेत. लखनऊ, वाराणसी या ठिकाणी होणारी विविध विकासकामांसाठी, रस्त्यांवर धावणाऱ्या बस, सिंचन प्रकल्पाची कंत्राटे गुजरातमधील कंपन्यांना देण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमधील लोकांचा वापर केवळ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केला जातो, निवडणूक झाल्यानंतर त्यांना भजी (पकोडे) तळायला वाऱ्यावर सोडून दिले जाते आणि सत्तेचा मलिदा मात्र गुजरातच्या कंपन्यांच्या घशात घातला जातो. या मुद्द्यावर आम्ही आवाज उचलणार आहोत.
प्रश्न : इंडिया आघाडीत समाजवादी पक्ष आहे, पण इथे तुम्ही एकमेकांविरोधात कसे?
आघाडी आणि इतर निर्णय केंद्रातील नेतृत्व घेणार आहे आणि जेव्हा जेव्हा आमच्या सूचना मागितल्या जातील, तेव्हा तेव्हा आम्ही त्या देऊ. आम्ही उत्तर प्रदेशमधील सर्वच्या सर्व ८० लोकसभा मतदारसंघाची तयारी करत आहोत. त्याउपर केंद्रातून जो आदेश येईल, त्याचे पालन आम्ही करू.
तुमच्या भावाच्या हत्येचा आरोपी मुख्तार अन्सारीला ३२ वर्षांनी दोषी ठरविण्यात आले आहे, याचे श्रेय भाजपा सरकारला देणार का?
नाही. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, क्रिष्णानंद राय खटल्यात मुख्तार अन्सारीला मोकळे सोडले तेव्हा केंद्र आणि राज्यात त्यांचेच (भाजपाचे) सरकार होते. जर त्यांना माफिया आणि गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई करून त्यांचे श्रेय घ्यायचेच असते तर त्यांनी क्रिष्णानंद केसमध्ये अन्सारीला मुक्त का केले? त्यावेळी ते गंभीर नसल्यामुळेच अन्सारी तुरुंगाबाहेर आला. मी तेव्हा त्यांच्यासोबतच काम करत होतो, त्यावेळी मी याबद्दल त्यांच्याशी अनेकदा बोललो. त्यासाठीच मी काँग्रेसला वाढविण्याचे आव्हान स्वीकारले आहे आणि जर गरज पडलीच तर त्यांच्या बुलडोजरसमोरही मी उभा राहीन.
तुम्ही बुलडोजरविषयी बोलत आहात, याचा अर्थ यावेळी योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढविणार का?
माझे पहिले लक्ष्य मोदीजी आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात लढत आहोत. योगीजी फक्त मोदीजी जे म्हणतात, त्यावर काम करतात. जेव्हा पॉवर हाऊसशी लढाई सुरू असते, तेव्हा ट्रान्सफॉर्मरशी कशाला भांडायचे? माझे कुणाबरोबरही वैयक्तिक वैर नाही. मोदीजी आणि योगीजी मला भाकरी देतील, याची मला अपेक्षा नाही. मी लोकांच्या मुद्द्यावर लढत आहे. म्हणूनच सरकारकडे मी पुरेशी सुरक्षा मागितली आहे. जर त्यांनी सुरक्षा पुरविली तर चांगलेच आहे, नाही पुरविली तर त्यांच्याकडून तशीही फारशी अपेक्षा नाही.