देशात या वर्षी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या चार महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी स्थानिक तसेच राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केली आहे. दरम्यान, काँग्रेसने कर्नाटकनंतर या चारही राज्यांत विजयी पतका फडकवण्यासाठी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.
रणदीप सुरजेवाला मध्य प्रदेशचे वरिष्ठ निरीक्षक
काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसच्या कर्नाटकमधील विजयाचे श्रेय सुरजेवाला यांनादेखील द्यावे लागेल. कारण तेव्हा ते कर्नाटक राज्याचे प्रभारी होती. त्यांच्यावर पक्षाने आता आणखी महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांना मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीची तयारी करण्यासाठी तसेच समन्वय साधण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी
काँग्रेसने राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा या राज्यांचीही जबाबदारी वेगवेगळ्या नेत्यांवर सोपवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधूसदन मिस्त्री यांची राजस्थानचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना छत्तीसगड राज्याचे वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. अशाच प्रकारे पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या नेत्या दीपा दासमुन्सी यांच्याकडे तेलंगणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मिझोरम राज्याचे वरिष्ठ निरीक्ष म्हणून पक्षाचे प्रशिक्षण विभागाचे प्रभारी सचिन राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडची सध्या परिस्थिती काय?
सध्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत थेट काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष चांगल्या स्थितीत आहे. म्हणजेच येथे काँग्रेसला कोठेही अंतर्गत बंडाळीला तोंड द्यावे लागेल अशी सध्यातरी परिस्थिती नाही. येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. तर राजस्थानमध्ये काँग्रेसला अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहेत. येथे काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांच्यातील वादामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पक्षाच्या नेतृत्वावरून या दोन्ही नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. छत्तीसगडमध्येही नेतृत्वाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र टी. एस सिंहदेव यांना उपमुख्यमंत्रिपद देऊन तेथील अंतर्गत बंडाळी थोपवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे.
वेगवेगळ्या राज्यांचे अन्य निरीक्षक
दरम्यान, सध्याची राजस्थानमधील परिस्थिती पाहता माजी आएएस अधिकारी तथा काँग्रेसचे नेते शशिकांत सेंथिल यांच्यावरदेखील राजस्थानचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते मधूसदन मिस्त्री यांना सहकार्य करतील. मुंबईचे माजी महापौर चंद्रकांत हंडोरे (मध्य प्रदेश), मीनाक्षी नटराजन (छत्तीसगड) आणि सिरिवेल्ला प्रसाद (तेलंगणा) हे नेतेही वेगवेगळ्या राज्याचे निरीक्षक आहेत.