गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या एका जाहीर कार्यक्रमात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सभा सुरू असताना एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने AIMIM आणि काँग्रेस समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. गुजरातमधील गोध्रा येथे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
गोध्रा विधानसभा मतदारसंघात लक्षणीय मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळे येथे काँग्रेस आणि एआयएमआयएममध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान बुधवारी काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगढी गोध्रा येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी एमआयएमवर निशाणा साधला. त्यामुळे घटनास्थळी एकचगोंधळ निर्माण झाला आणि यावेळी लोकांनी त्यांना सभा सोडण्यास सांगितले. या घटनेवर भाष्य करताना इम्रान प्रतापगढी म्हणाले की, सभेच्या ठिकाणी कोणताही गोंधळ झाला नाही आणि जे काही घडलं ते लोकांचे प्रेम आणि आपुलकी होती. ओरडून दाद देण्याला गोंधळ म्हणता येणार नाही, असंही ते म्हणाले.
खरं तर, काँग्रेसचा एक मोठा मुस्लीम चेहरा म्हणून इम्रान प्रतापगढी यांच्याकडे पाहिलं जातं. ते उर्दू आणि हिंदी भाषांमध्ये लेखन करणारे कवी आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर या वर्षी जुलैमध्ये काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर निवडून दिले.
हेही वाचा- भारत जोडो यात्रेतून काय मिळालं? तुमच्यात काय बदल झाला? राहुल गांधी म्हणाले “मी बऱ्याच वर्षांपूर्वी…”
गुरुवारपासून गुजरातमधील सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरात विभागातील ८९ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अहमदाबाद शहरातील १६ जागांसह उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.