उरण : लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघात १३ हजार मतांनी पिछाडीवर पडलेल्या महायुतीला शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील द्वंद्वामुळे विजयाची आशा दिसू लागली आहे. या मतदारसंघातील भाजपचे आमदार महेश बालदी यांच्याविषयी असलेली नाराजी, राज्य सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमुळे स्थानिक भूमीपुत्रांमध्ये असलेली अस्वस्थता आणि दि.बा.पाटील यांच्या नामांतराचा गाजत असलेला प्रश्न यामुळे ही निवडणुक भाजपला सोपी नाही असेच चित्र होते. असे असले तरी सुपीक जमिनीवर महायुतीविरोधात रान पेटविण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याने बालदी यांचे समर्थक सध्या खुशीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रायगडमधील महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने उरण विधानसभा मतदारसंघात प्रितम म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली अहो. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे. शेकापच्या या निर्णयाने भाजपाला पुन्हा संधी मिळाल्याची भावना आता बालदी समर्थकांमध्ये आहे. महाविकास आघाडी उरण, पनवेल, पेण, अलिबाग या जागेसंबंधी सकारात्मक निर्णय घेईल अशी आशा शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली असली तरी स्थानिक पातळीवर हे गणित जुळून येईल का याविषयी आघाडीतच साशंकता आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या निकालात उरण विधानसभा मतदारसंघात शेकापच्या साथीने महाविकास आघाडीला १३ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. या मतदारसंघात भाजपचे अपक्ष विद्यमान आमदार असतानाही महाविकास आघाडीने अधिकची मते घेतल्याने विधानसभा निवडणुकीत आघाडीला सकारात्मक चित्र तयार झाले होते.

हेही वाचा : उमेदवारी यादीत पक्षांना ‘नऊ’ आकड्याची भुरळ

भाजपलाही कठीण पेपर ?

उरण विधानसभा मतदारसंघात भाजपा वगळता शिंदे गट आणि अजित पवार गट यांची ताकद फार अल्प आहे. या विधानसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी(शरद पवार) त्याच बरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर संघटनांची आघाडी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अपक्ष विजयी आमदार महेश बालदी यांना ७५ हजार पेक्षा अधिक मते मिळावी होती. त्यांच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढविणारे अखंड शिवसेनेला ७० हजार तर शेतकरी कामगार पक्षाला ६० हजार अधिक काँग्रेस अशी एकूण जवळपास दीड ते पावणे दोन लाख मत मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी अनूकुल वातावरण असले तरी उद्धव सेनेने येथे मनोहर भोईर यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय पक्का केल्याने भाजपमध्ये खुशीचे वातावरण आहे.

महाविकास आघाडीतील इच्छुकांची संख्या वाढली

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत उरण विधानसभेत मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आशा वाढल्या आहेत. निवडणूकीत विजयाची खात्री असल्याने शिवसेना(ठाकरे गट) यांच्याकडून माजी आमदार मनोहर भोईर, शेकापचे प्रितम म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. त्यांनी तुरूंगातून राजकीय संन्यास जाहीर केला आहे. तरीही त्यांचा या मतदारसंघातील दबदबा कायम आहे. त्यांचे समर्थक आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : संदीप नाईकांच्या बंडामुळे महायुती एकवटली

गावपाड्यात शेकाप मजबूत

गेल्या पाच वर्षात शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी झाली आहे. असे असले तर गाव पातळीवर मजबूत असलेल्या या पक्षाची मूळ कायम आहेत. शेकाप निवडणूक लढविणार असल्याचे घोषित होताच पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. तर भाजप तसेच इतर पक्षात दाखल झालेल्यापैकी अनेकजण परतीच्या मार्गावर आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uran vidhan sabha election 2024 shetkari kamgar paksha vs uddhav thackeray shivsena print politics news css