US deportation second flight amritsar : अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना लष्करी विमानांमधून मायदेशात परत आणलं जात आहे. स्थलांतरितांना घेऊन येणारी विमानं दिल्लीत नाही तर पंजाबमध्ये उतरत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचं पहिलं लष्करी विमान भारतीयांना घेऊन पंजाबमध्ये उतरलं होतं. आता दुसरं विमान ११९ निर्वासितांसह शनिवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळी अमृतसरमध्ये उतरणार आहे. यावरून पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार बेकायदा स्थलांतरितांना जाणून बुजून पंजाबमध्ये उतरवत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले भगवंत मान?

पंजाब राज्याला बदनाम करण्याचा हा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोपही भगवंत मान यांनी केला आहे. अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या दुसऱ्या विमानात पंजाबमधील ६७ आणि हरियाणातील ३३ बेकायदा स्थलांतरित आहेत. याशिवाय इतर राज्यांतील १९ नागरिकही विमानात असल्याची माहिती आहे. दरम्यान, अमेरिकेतून १०४ भारतीयांना घेऊन आलेले पहिले विमान ५ फेब्रुवारीला अमृतसरमध्ये उतरले होते.

निर्वासितांना अमानुष वागणूक?

या विमानात गुजरात आणि हरियाणातील प्रत्येकी ३३ आणि पंजाबमधील ३० निर्वासितांचा समावेश होता. अमेरिकेच्या लष्कराने विमानातील भारतीयांना अमानुष वागणूक दिली, असा आरोप आम आदमी पार्टी आणि काँग्रेस नेत्यांनी केला. भारतात आलेल्या निर्वासितांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या, असा दावा विरोधी पक्षांनी केला. यावरून आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेच्या सभागृहाबाहेर आंदोलनेही केली.

आणखी वाचा : Gujarat Election 2025 : गुजरातमध्ये भाजपाचाच दरारा, निवडणूक न लढताच इतक्या जागांवर विजयी

‘पंजाबला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा डाव’

अमेरिकेने बाहेर काढलेल्या भारतीयांना घेऊन लष्कराचे तिसरं विमानही १६ फेबुवारीला अमृतसरला उतरणार आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधून मुख्यमंत्री मान यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, “पंजाबला बदनाम करण्यासाठी निर्वासितांना जाणून बुजून अमृतसरला उतरवलं जात आहे. पंजाबी नेहमीच केंद्राच्या प्रतिगामी धोरणांविरोधात उभे राहिले आहेत, म्हणूनच भाजपा त्यांच्याविरुद्ध द्वेष बाळगून आहे आणि त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावरही मुख्यमंत्री भगवंत मान यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान भारतीय नागरिकांना बेड्या घालून अमेरिकन लष्करी विमानांमधून भारतात पाठवले जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांना दिलेलं हे गिफ्ट आहे.” दरम्यान, ‘आप’च्या नेत्याने याआधीही पहिल्या विमान उड्डाणावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, “आपल्या देशासाठी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की अमेरिका आपल्या नागरिकांना बेड्या आणि हातकड्या घालून पाठवते. अमेरिकेतून बाहेर काढलेल्या भारतीयांच्या जखमा भरण्याऐवजी मोदींचे हरियाणा सरकार त्यांना पोलिस कैदी व्हॅनमध्ये घेऊन जात आहे, हे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखं आहे.”

आम आदमी पार्टीचे नेते काय म्हणाले?

आम आदमी पार्टीचे पंजाबचे अध्यक्ष अमन अरोरा यांनीही अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांच्या हद्दपारीबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, “केंद्र सरकारचे हे पंजाबविरोधी धोरण आहे, ज्याचा उद्देश पंजाब राज्याची प्रतिमा मलिन करणे आहे.” याशिवाय, शेतकरी संघटनांनीही भाजपावर पंजाबविरोधी पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. भारतीय किसान युनियनच्या सरचिटणीस सुखविंदर कौर म्हणाल्या, “पंजाबमध्ये भाजपाला बहुमत नसल्याने ते वारंवार आम्हाला बाजूला सारल्याची भावना निर्माण करतात. पिकांच्या किमान आधारभूत किमतींसाठी शेतकरी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, परंतु केंद्र सरकारने अद्यापही त्यांची दखल घेतलेली नाही.”

पंजाबमधील स्थलांतरितांचे प्रमाण जास्त का?

संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक जगजीत सिंग दलेवाल यांनी बेकायदा स्थलांतराचा मुद्दा पंजाबच्या आर्थिक दुर्दशेशी जोडला. १२ फेब्रुवारी रोजी खनौरी सीमेवर झालेल्या किसान महापंचायतीला संबोधित करताना ते म्हणाले, “लोक पंजाब का सोडत आहेत याचे विश्लेषण आपण केले पाहिजे. शेती फायदेशीर नाही आणि तरुणांना चांगल्या संधींच्या शोधात स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही. पिकांना हमीभाव देण्याची आमची मागणी ही केवळ पंजाबपुरतीच मर्यादित नाही, तर संपूर्ण भारतात स्व-रोजगार सुनिश्चित करण्यासाठी आहे.”

‘अमृतसर देशाचा भाग नाही का?’

दुसरीकडे भाजपाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांचे सर्व दावे फेटाळून लावले आणि पक्षावर खऱ्या मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा आरोप केला. पंजाबमधील भाजपाचे उपाध्यक्ष सुभाष शर्मा म्हणाले, “अमृतसर देशाचा भाग नाही का? विमान कुठे उतरत आहे यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मूळ कारणावर लक्ष केंद्रित करायला हवं. पंजाबमधून इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक स्थलांतर का करत आहेत याची कारणे शोधावी. जर विमान दुसरीकडे उतरले असते तर वस्तुस्थिती बदलली असती का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

‘पंजाबमध्येही आम आदमी पार्टीचा पराभव होणार’

सुभाष शर्मा आम आदमी पार्टीवर टीका करताना म्हणाले, पंजाबच्या विकासासाठी काम करण्याऐवजी ‘आप’चे नेते खोट्या कथा रचत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना मतदारांनी नाकारलं आहे. पंजाबमध्येही लवकरच आम आदमी पार्टीचा सुपडा साफ होईल.” भाजपा नेत्याने असाही युक्तिवाद केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने पंजाबमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. १९८४ च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात बुधवारी माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना झालेल्या शिक्षेवरही प्रदेश भाजपाने भाष्य केलं आहे. या प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून दिल्याबद्दल केंद्र सरकारचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असं म्हणत भाजपा नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. शिखांच्या भावनांप्रती असलेल्या वचनबद्धतेबद्दल संसदेत ठराव मांडावा, असा सल्लाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी दिला आहे.

भाजपा पंजाबविरोधी असल्याचा आपचा आरोप

लुधियाना येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष पुष्पिंदर सिंग यांनी भाजपावर पंजाबविरोधी असल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “आम आदमी पार्टी (AAP) पंजाबच्या हितांविरोधात काम करत आहे, त्यामुळेच दिल्लीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. मोदी सरकारने नेहमीच पंजाब आणि त्यांच्या लोकांना प्राधान्य दिले आहे. ‘वीर बाल दिवस’सारख्या उपक्रमांमुळे गुरु गोविंद सिंगजींच्या छोट्या साहिबजाद्यांच्या स्मरणार्थ पंजाबचा समृद्ध इतिहास भारतभर पोहोचला आहे. भाजपाने करतारपूर साहिब कॉरिडॉर उघडण्यास मदत केली, जे पंजाबमधील जनतेसाठी आणखी एक ऐतिहासिक पाऊल आहे.”

हेही वाचा : Lok sabha Elections 2024 : निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; राजकीय पक्षावर अशी वेळ का ओढवली?

‘निर्वासितांना पंजाबमध्येच का उतरवलं जात आहे?’

लुधियानातील एका इमिग्रेशन सल्लागाराने बेकायदा स्थलांतरित भारतीयांच्या हद्दपारीसाठी फक्त अमृतसरची निवड केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “भाजपा काहीही दावा करत असला तरी येथील लोकांना सत्य माहिती आहे. तुम्ही रोजंदारीवर काम करणारे कामगार आहात की सहा अंकी पगार मिळवत आहात हे महत्त्वाचे नाही. निर्वासितांसाठी फक्त अमृतसरची निवड केल्याने सर्वांना त्रास होतो.” लुधियानातील आणखी एक रहिवासी, सॉफ्टवेअर अभियंता जसकीरत सिंग यांनी या प्रकरणावर निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, “जर अमृतसरमध्ये निर्वासितांची विमाने उतरत राहिली तर असा संदेश जाईल की, बेकायदा स्थलांतरितांमध्ये पंजाबी लोक बहुसंख्य आहेत, जे खरे नाही. हा वाद टाळण्यासाठी राष्ट्रीय राजधानीची निवड करायला हवी होती.”

लुधियानातील एका आर्थिक सल्लागाराने सांगितले, “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील पंजाबी लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, पण दुसरीकडे येथे पंजाबी लोकांची बदनामी केली जाते. शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी एक वर्षाहून अधिक काळ महामार्गांवर निदर्शने करत आहेत; हेच कारण आहे का पंजाबला लक्ष्य केले जात आहे?”

Story img Loader