JD Vances India Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यापासून अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांमध्ये प्रामुख्याने नवीन टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा समावेश आहे. या टॅरिफचा जगातील अनेक देशांना फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफसंदर्भातील निर्णयांचा जगभरातील अनेक देशांच्या शेअर बाजारातही मोठा परिमाण झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर जगातील अनेक देशांनीही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर अखेर ट्रम्प यांनी आयातशुल्क धोरणाला ९० दिवसांची स्थगिती दिली. यामध्ये भारतावरही २६ टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. पण त्यानतंर ९० दिवसांसाठी हा निर्णय पुढे ढकलण्यात आला. मात्र, अद्यापही चीन आणि अमेरिकेतील ‘टॅरिफ वॉर’ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

असं असतानाच आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या भारत दौऱ्याकडे अनेक देशाचं लक्ष लागलं आहे. जेडी व्हान्स यांच्या या दौऱ्यात अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमधील संबंध बळकट करणे, द्विपक्षीय व्यापार वाढवणे, द्विपक्षीय व्यापार करारांना अंतिम स्वरूप देणे, द्विपक्षीय व्यापार करार अशा आदी महत्वाच्या विषयांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेडी व्हान्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे त्यांच्या पत्नी उषा व्हान्स आणि त्यांची तीन मुले इवान, विवेक आणि मिराबेल या दौऱ्यात त्यांच्याबरोबर सहभागी असणार आहेत. तसेच त्यांच्या बरोबर अमेरिकेच्या प्रशासनातील काही अधिकारी देखील या दौऱ्यात सहभागी आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता नवी दिल्ली येथील पालम एअरबेसवर ते भारतात दाखल झाले आहेत. इटलीला भेट दिल्यानंतर ते भारत दौऱ्यावर आले आहेत. जेडी व्हान्स यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी स्वागत करणार आहेत. तसेच जेडी व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा व्हान्स यांच्याबरोबर रात्री जेवण करणार आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यामध्ये व्यापार, आयात शुल्क, प्रादेशिक सुरक्षा आणि एकूणच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जवळपास ६० देशांविरुद्ध मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लागू केल्यानंतर आणि त्यानंतर काही दिवसांनी या निर्णयाला स्थगिती दिल्याच्या काही आठवड्यांनंतर जेडी व्हान्स हे भारत दौऱ्यावर आल्यामुळे त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर जेडी व्हान्स यांच्या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अजित डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह आदी महत्वाचे अधिकाऱ्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जेडी व्हान्स हे दिल्लीत पोहोचल्यानंतर काही वेळातच जेडी व्हान्स आणि त्याचं कुटुंब स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहे. या बरोबरच ते पारंपारिक भारतीय हस्तनिर्मित वस्तू विकणाऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला देखील भेट देऊ शकतात असंही सांगितलं जात आहे. या बरोबरच दिल्ली व्यतिरिक्त जेडी व्हान्स आणि त्यांचं कुटुंब जयपूर आणि आग्रा येथेही भेट देणार आहेत. जेडी व्हान्स हे विविध ठिकाणी भेट देणार असल्यामुळे त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. दिल्लीत ते ज्या ठिकाणी थांबणार आहेत, तेथेही मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.