अलिबाग – बैलगाडी स्पर्धांवरील बंदी उठल्यानंतर या शर्यतींना मिळणारा प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे पारंपारीक खेळ असलेल्या या बैलगाडी शर्यतींना आता व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. राजकीय लाभासाठी राजकीय पदाधिकारी आणि पक्ष यात गुंतवणूक करू लागले आहेत. त्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसांची खैरात वाटली जात आहे, त्यामुळे काही भागांपुरते मार्यादीत असलेले बैलगाडी स्पर्धांचे लोण जिल्हाभर पसरू लागले आहे. स्पर्धांना मिळणारा राजकीय आश्रय यास कारणीभूत ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बैलगाडी स्पर्धा हा शेतकऱ्यांचा पारंपारीक खेळ समजला जातो. शेती हंगाम संपल्यानंतर बैलांना शेतीची कामे नसल्याचे ते बसून राहत असत. त्यामुळे या शेती हंगामानंतर बैलगाडी स्पर्धांचे आयोजन केले जाऊ लागले. सुरवातीला भांडी पिंप, ढाली अशी बक्षिसे या स्पर्धांच्या निमित्ताने वाटली जात असे. नंतर मात्र स्पर्धे दरम्यान बैलांना अमानुष मारहाणीचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे प्राणीमित्र संघटना न्यायालयात गेल्या. त्यामुळे न्यायालयाने बैलगाडी स्पर्धांवर निर्बंध आणले होते. सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध उठवले. अटी आणि शर्तींवर स्पर्धांच्या आयोजनाला परवानगी दिली आहे. यानंतर बैलगाडी स्पर्धांचे आयोजन पुन्हा जोमाने सुरू झाले आहे. स्पर्धांना मिळणारा प्रतिसादही वाढता आहे. त्यामुळे हजारोच्या संख्येत प्रेक्षकांची गर्दी या निमित्ताने उसळण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे स्पर्धांचे पारंपारीक स्वरूप पालटून त्याला व्यवसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. लाखो रुपयांची बक्षिसे या निमित्ताने जाहीर केली जाऊ लागली आहेत.

हेही वाचा – सोलापूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीची डोळा? सुशीलकुमार शिंदे यांची भूमिका महत्त्वाची

राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राजकीय लाभासाठी आपला मोर्चा स्पर्धांकडे वळविला आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांकडून स्पर्धांचे आयोजन सुरू झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे स्पर्धेनिमित्ताने मोठमोठ्या बक्षिसांची खिरापत या निमित्ताने वाटप केली जाऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत तालुक्यातील नेते सुधाकर घारे यांनी नुकतेच भव्य बैलगाडी स्पर्धांचे आयोजन केले होते. आता अलिबाग तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची घोषणा होताच शिवसेना ठाकरे गटानेही बैलगाडी स्पर्धेची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धेत महागडी एसयूव्ही गाडी, बुलेट, बैलजोडीसारखी बक्षिसे दिली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आडून मतांची बेगमी करण्याचे धोरण राजकीय पक्षांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – राज्यात लोकसभा आणि विधानसभा एकत्र की स्वतंत्रपणे?

जिल्ह्यात सुरवातीला काही तालुक्यामध्येच बैलगाडी स्पर्धांचे आयोजन होत होते. मात्र या स्पर्धेला व्यवसायिक स्वरूप आणि राजकीय आश्रय प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर भागातही बैलगाडी स्पर्धांच्या आयोजनाला सुरवात झाली आहे. या स्पर्धांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीतून राजकीय फायदा कोणाला मिळणार हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of bullock cart competitions in raigad for politics print politics news ssb