आगामी लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुका लक्षात घेता आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद रावण आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर आझाद समाज पार्टी तसेच समाजवादी पार्टी यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> Senegal Bus Accident : सेनेगलमध्ये दोन बसेस समोरासमोर धडकल्या, ४० जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी
शनिवारी (७ जानेवारी) चंद्रशेखर आझाद आणि अखिलेश यादव यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाला रोखण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीबात चंद्रशेखर आझाद यांनी अधिक माहिती दिली आहे. “भाजपाने ओबीसी समाजाची निराशा केली आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केली जात आहे. मग केंद्र सरकारकडून तसे का केले जात नाही. भाजपाचा ओबीसी आणि दलित विरोधी अजेंडा उघडा पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. अखिलेश यादव यांच्यासोबतच्या बैठकीत याच विषयावर चर्चा करण्यात आली,” असे आझाद यांनी सांगितले.
हेही वाचा >>> मनरेगा योजनेवरून पश्चिम बंगालमध्ये राजकारण, केंद्राने ७५०० कोटींचा निधी रोखून धरल्याचा ममता सरकारचा आरोप!
अखिलेश यादव आणि चंद्रशेखर आझाद यांच्यात आगामी काळात युती होण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने तशी शक्यता व्यक्त केली आहे. “आगामी काळात युती होण्याची शक्यता असल्यामुळेच या दोन नेत्यांमध्ये बैठका होत आहेत. मात्र तत्कालीन परिस्थितीवर ते अवलंबून असेल,” असे या नेत्याने सांगितले.
हेही वाचा >>> काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात? अनेक नेत्यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये मागील वर्षी मार्च महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर या दोन नेत्यांमध्ये जवळीक वाढलेली आहे. या निवडणुकीपुर्वी दोन्ही नेत्यांमध्ये युतीच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी बैठका झाल्या होत्या. मात्र त्यावेळी युती होऊ शकली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रशेखर आझाद आणि अखिलेश यादव अनेकवेळा एका मंचावर दिसलेले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही नेते भाजपाचा सामना करण्यासाठी एक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.