यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ‘चारशेपार’ जाण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाला मोठा फटका बसला आहे. खासकरून उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यामध्ये भाजपाच्या जागा लक्षणीयरित्या घटल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश हा भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमधील मतदारांनी इंडिया आघाडीलाही चांगला कौल दिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या खासदारांची संख्या ६२ वरून ३३ वर घसरली आहे. उत्तर प्रदेशमधील आपल्या सुमार कामगिरीचे विश्लेषण भाजपाने केले आहे. दलितांची मते इंडिया आघाडीकडे गेल्यानेच उत्तर प्रदेशमधील कामगिरी घसरली असल्याचे निदान भाजपाने केले आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा दलित मतदारांना आपल्याशी जोडून घेण्यासाठी भाजपाने कृतीकार्यक्रम आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष नुकतेच लखनौमध्ये निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी पक्षातील दलित नेत्यांची स्वतंत्र बैठकही घेतली आहे. या बैठकीला दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार आणि खासदारांचा समावेश होता.
हेही वाचा : कुर्मी मतांना आपलेसे करण्याचा प्रयत्न; उत्तर प्रदेश-झारखंडच्या निवडणुकीसाठी जेडीयूची तयारी
दलित समाजाबरोबरचा संवाद तुटलेला असणे आणि आपला संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये असमर्थ ठरणे या दोन मोठ्या कारणांमुळेच भाजपाची या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील कामगिरी खराब राहिली आहे. दलित समाजाचा गमावलेला जनाधार पुन्हा प्राप्त करण्यासाठी त्या समाजाबरोबर पुन्हा संबंध प्रस्थापित करणे आणि विरोधकांनी पसरवलेले भ्रम खोडून काढणे अशी जबाबदारी पक्षातील नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या १७ जागांवर भाजपाने दर्जेदार कामगिरी केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये, या १७ जागांपैकी १४ जागा जिंकलेल्या भाजपाने या निवडणुकीमध्ये फक्त आठ जागा जिंकल्या आहेत. २०१९ मध्ये अपना दलाला एक, तर बहुजन समाज पार्टीला दोन जागा प्राप्त झाल्या होत्या.
मात्र, यावेळी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या १७ पैकी बहुतांश जागा समाजवादी पार्टीकडे (७) गेल्या आहेत; तर काँग्रेस आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बहुतांश लोकसभा मतदारसंघांतील जाटवेतर दलितांची मते मिळवण्यात भाजपाला यश आले होते. सरचिटणीस संतोष यांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने म्हटले की, “समन्वयाचा अभाव, समाजाच्या सदस्यांना गतिशील करण्यात आलेले अपयश, सरकारविरोधी जनमताचा कौल आणि निव्वळ नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या नावावर आपण निवडून येऊ शकतो, असा अतिआत्मविश्वास या कारणांमुळे ही पिछेहाट झाली आहे. या त्रुटी आमच्या बाजूनेच राहिल्या आहेत आणि आम्हीच त्या दुरुस्त करायला हव्यात.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपामध्ये दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बेबी राणी मौर्य, गुलाब देवी, असीम अरुण आणि दिनेश खाटिक यांचा समावेश आहे. या दलित नेत्यांसमवेतच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही दलितांमध्ये जाऊन विरोधकांनी पसरवलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपाचे अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख रामचंद्र कनौजिया म्हणाले की, “आमच्याकडून चुका झाल्या आहेत. आम्ही त्यांच्याजवळ जाऊ आणि या चुका दुरुस्त करू.” पुढे कनौजिया म्हणाले की, “अपेक्षा खूप होत्या, पण आम्ही पक्ष नेतृत्वाला निराश केले. मात्र, आमच्या बाजूची मते त्या बाजूला गेलेली नाहीत, याची खात्री मी तुम्हाला देतो. विरोधकांकडून संविधानाबाबत चुकीची माहिती पसरवल्यामुळे ते भ्रमित झाले. केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांची माहितीही आम्ही दलित समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करू.” काँग्रेसने दलितांपर्यंत पोहोचण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत विचारले असता ते म्हणाले की, “त्यांचे पितळ उघड पडले असून त्यांना आता यश मिळणार नाही.”