UP Politics: भारतीय जनता पार्टी आगामी काळात होणाऱ्या उत्तर प्रदेश शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाद्वारे भाजपा आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल आणखी वाढवणार आहे. भाजपाने या अगोदरही २०१४ च्या लोकसभा आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात विकासाचे “गुजरात मॉडेल” सादर केले होते.
जिल्हा आणि विभागीय घटकांच्या समितीच्या बैठकीतही होणार चर्चा –
उत्तर प्रदेश भाजपामधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात मॉडेलला घेऊन सर्व जिल्हे आणि विभागीय घटकांच्या कार्यकारी समितीच्या बैठकीतही चर्चा केली जाईल.१२ फेब्रुवारीपर्यंत राज्यात या बैठका होणार असल्याचे निश्चित आहेत. या दरम्यान पक्षनेते गुजरातमधील विजयाचे उदाहरण देऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतील.
यावर एका भाजपा नेत्याने सांगितले की २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत उत्रत प्रदेशात पक्षाद्वारे जिंकलेल्या जागांमध्ये घट झाल्याचे दिसून आली होती. २०१४ लोकसभा निवडणूक आणि २०१७ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाने कमी जागा जिंकल्या होत्या. हे पाहता उत्तर प्रदेशात गुजरात मॉडेल सादर करण्याची तयारी सुरू आहे.
प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत योगींकडून गुजरातमधील विजयाचा उल्लेख –
लखनऊमध्ये रविवारी भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विभागीय संघटनांच्या अध्यक्षांनी गुजरातमधील भाजपाच्या विजयाचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाषणात सांगितले, गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपाचा झालेला ऐतिहासिक विजय आपल्याला एक नवा उत्साह आणि काम करण्याची प्रेरणा देतो. याचबरोबर बैठकीत उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे अध्यक्ष भूपेंद्र सिंह चौधरी यांनीही गुजरातमधील विजयाचा उल्लेख करत, पक्षाने इतिहास रचल्याचं सांगितलं.