पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हुकूमशाही पद्धतीचे आणि लोकशाहीविरोधी असल्याचा प्रचार काँग्रेसकडून सतत सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश भाजपाने युवक मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवे प्रचारतंत्र अवलंबले आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर प्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात इमर्जन्सी या माहितीपटाचे स्क्रीनिंग भाजपातर्फे करण्यात येणार आहे. भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली असून उत्तर प्रदेश राज्यातून सर्वाधिक खासदार निवडून जातात. यासाठी भाजपाने आपल्या मोदी सरकारचा नऊ वर्षांचा कार्यकाळ आणि “आणीबाणी जागरूकता मोहीम” हाती घेतली आहे.
एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने सांगितले की, इमर्जन्सीनंतर जन्मलेल्या तरुणांसाठी २५ जून रोजी हा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. काँग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या काळात देशाला काय भोगावे लागले, याची माहिती आजच्या तरुणांना नाही. या कार्यक्रमासाठी समाजातील विचारवंत मंडळींनाही आमंत्रित केले जाणार आहे. तरुणांनी इमर्जन्सीचा माहितीपट पाहावा. तसेच काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकाळाची तुलना करावी, असा यामागचा उद्देश असल्याचेही या नेत्याने सांगितले.
हे वाचा >> लालकिल्ला : मोदींच्या राजवटीची ९ वर्षे!
उत्तर प्रदेश भाजपाने असेही सांगितले की, आणीबाणीमध्ये राजकीय कारावास भोगावा लागलेल्या लोकतंत्र सेनानींना २५ जून रोजी पक्षातर्फे गौरविण्यात येईल. या वेळी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आणीबाणीसंबंधी जागृती निर्माण करण्यावर आमचा भर असेल. महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये भाजपाकडून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात इतर चौदा प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जातील. तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मिरवणूकही काढली जाणार आहे.
३० मे रोजी मोदी सरकारच्या कार्यकाळाला नऊ वर्षं पूर्ण होत आहेत. यासाठी भाजपाने महिन्याभराचे ‘महासंपर्क अभियान’ हाती घेतलेले आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम देशाच्या इतर भागात आयोजित करण्याचा निर्णयही पक्षाने घेतलेला आहे. सोमवारी (दि. २९ मे) या कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी करणार आहेत. लखनऊ येथे पत्रकार परिषद आयोजित करून मोदी सरकारच्या नऊ वर्षांतील उपलब्धी सांगण्याचा प्रयत्न ते करतील.
महिनाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात भाजपा ‘विकासतीर्थ का अवलोकन’ हा कार्यक्रमही घेणार आहे. या वेळी पक्षाने तीर्थक्षेत्राचा केलेला विकास, तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने हाती घेतलेले विकास प्रकल्प दाखविण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या कार्यक्रमांतर्गत पत्रकार आणि इतर काही मंडळींना या प्रकल्पांच्या स्थळी नेऊन तेथे चाललेल्या कामांची माहिती करून देणार आहे. स्थानिक खासदार, आमदार आणि पक्षाचे नेते, पक्षाचे जिल्हा पदाधिकारीदेखील या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असतील. यासोबतच ८० लोकसभा मतदारसंघांतील प्रत्येक मतदारसंघातील २५० प्रमुख कुटुंबाची यादी तयार केली जाईल. या यादीत पद्म पुरस्कारप्राप्त, खेळाडू, कलाकार, डॉक्टर, माजी न्यायाधीश आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असेल. भाजपाचे नेते या कुटुंबांना भेट देऊन भाजपाला समर्थन देण्याचे आवाहन करणार आहेत.
हे वाचा >> मोदी सरकारने ९ वर्षांत आणल्या ९ महत्त्वाच्या योजना, बदलले करोडोंचे नशीब
याबरोबरच व्यापाऱ्यांसोबतही बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. भाजपाच्या नेत्याने सांगितल्यानुसार, याआधी केवळ मोठे व्यापारी आणि व्यावसायिकांना भेटून त्यांचा पाठिंबा मागितला जात होता. मात्र या वेळी छोटे छोटे व्यापारी जसे की, किराणा दुकानदार, चप्पल विक्रेते, कपड्यांचे व्यापारी आदी. व्यापाऱ्यांनाही भेट दिली जाणार आहे. अशा व्यापाऱ्यांची संख्या अधिक आहे आणि त्यांच्या संपर्कात एक मोठा मतदारवर्ग असतो. या बैठकांमध्ये भाजपा सरकारने त्यांच्या आर्थिक उत्थानासाठी काय काय निर्णय घेतले, याची माहिती करून दिली जाणार आहे.