Uttar Pradesh Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत यावेळी भाजपाच्या जागा जवळपास निम्म्यावर आल्या. भाजपाला उत्तर प्रदेशात फक्त ३३ जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला उत्तर प्रेदेशात मोठं यश मिळालं. यानंतर भाजपाकडून चिंतनही करण्यात आलं. असं म्हटलं जातं की लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला आणि काँग्रेसला पासी आणि दलित समुदाच्या मतांचा मोठा फायदा झाला. मात्र, आता लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा आणि काँग्रेसला आव्हान देण्यासाठी मोठी योजना आखली आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘सपा’कडे वळलेल्या पासवान, पासी आणि दलित समुदायाला एकत्र करण्यासाठी मध्य आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये वंचित समाज संमेलनाची योजना चिराग पासवान यांनी आखली आहे. यामाध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये ठिकठिकाणी संमेलने घेण्यात येणार आहेत. आता यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. पासी समुदाय, महाराज बिजली पासी आणि उत्तर प्रदेशातील दुसऱ्या क्रमांकाच्या असलेल्या दलित समुदायाच्या हक्कांसाठी लढण्याचे उद्दिष्ट चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण
राज्यभरात विविध ठिकाणी वंचित समाज संमेलन आयोजित करून लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख, मंत्री चिराग पासवान हे फक्त समाजवादी पक्षाला (SP) आव्हानच देत नाहीत तर पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत आणि पोटनिवडणुकीत आव्हान देण्याची शक्यता आहे. मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अगोदर या राजकीय हालचालींना महत्व प्राप्त झाले आहे. पोटनिवडणुकीसाठी राज्यातील १० विधानसभा जागांपैकी एक जिथे लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) मित्रपक्ष भाजपा फैजाबादमध्ये पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये अयोध्येचाही समावेश आहे.
खरं तर रामविलास पासवान यांनी दलित समुदायांना एकत्रित करण्याचं काम केलं. मात्र, त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे आता चिराग पासवान दलित समुदायांना एकत्रित करण्याचं काम करत असल्याचं यावरून दिसून येत आहे. चिराग पासवान हे आता हळूहळू तरुण दलित चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) खासदार अरुण भारती यांनी पासी आणि पासवान यांना पुरेसे प्रतिनिधित्व न दिल्याचा आरोप सपा आणि बसपावर करत अरुण भारती यांनी सांगितलं की, अयोध्या आणि गोरखपूरमध्ये अशा प्रकारच्या परिषद आयोजित केल्या जातील. गेल्या आठवड्यात कौशांबी येथे चिराग पासवान यांच्या भेटीबाबत अरुण भारती यांनी सांगितलं की, त्यांच्या तारखा अद्याप ठरलेल्या नाहीत. पण नवरात्रीनंतर अशा आणखी बैठका होतील.
दरम्यान, चिराग पासवान यांच्या आव्हानाबाबत बोलताना सपा नेते राजेंद्र चौधरी यांनी म्हटलं की, रामविलास पासवान यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने राज्यात काय काम केलं? त्याचा मुलगा त्याच्यापेक्षा मोठा आहे का? ते केवळ भाजपाच्या सूचनेनुसार समुदायांशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांची ही चाल सर्वांसमोर आली आहे. त्यामुळे वंचित घटकांचा पाठिंबा अखिलेश यादव यांच्या पाठीशी आहे. कारण ते आपले खरे हितचिंतक आहेत हे वंचित घटकांना माहिती आहे, असं राजेंद्र चौधरी यांनी म्हटलं.
दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे नेते दावा करतात की, उत्तर प्रदेशात पासी-पासवान समुदायांची संख्या सुमारे १.२५ कोटी आहे. ते राज्यातील ४०३ विधानसभेच्या किमान १०३ जागांवर निवडणूक निकालांमध्ये निर्णायक भूमिका बजावतात. दोन्ही अनुसूचित जाती (SC) म्हणून वर्गीकृत आहेत आणि ते अयोध्या आणि गोरखपूर सारख्या राज्याच्या मध्य आणि पूर्व भागात केंद्रित आहेत. ते आता सपा आणि काँग्रेसचे मतदार आधार म्हणून पाहिले जात आहेत, तर बसपाला जाटवांचा दुसऱ्या दलित समुदायाचा पाठिंबा आहे. एलजेपी (आरव्ही) पक्षाचे खासदार शांभवी चौधरी यांनी २०२७ पूर्वी पासी आणि पासवान यांना एकत्र करण्याच्या पक्षाच्या योजनेबद्दल तपशीलवार माहिती दिली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २० जागा लढवल्या होत्या. आम्ही एकही विजय मिळवला नसला तरी आम्ही मैदानात यश मिळवले. अनेक लोक पक्षाशी संबंधित आहेत. चिराग पासवान हा पासी-पासवान समाजाचा चेहरा आहेत आणि आम्ही संपूर्ण दलित समाजाचा आवाज बनू, असं त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, गेल्या आठवड्यात पहिल्या वंचित समाज संमेलनात चिराग पासवान यांनी बोलताना पासी आणि दलित समुदायाचा केवळ मतदार म्हणून वापर केल्याचा आरोप सपावर केला. तसेच या समुदायांचे हरवलेले वैभव परत मिळवून देण्यासह पासी आणि पासवान प्रतिनिधीत्वासाठी लढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्यानंतर राजेंद्र चौधरी यांनीही चिराग पासवान यांच्यावर पलटवार करत पासी आणि पासवानांसाठी रॅली आणि परिषदा फायदेशीर ठरणार नसून मागास, दलित, अल्पसंख्याक समाजाला सपा राजवटीत फायदा झाला, अखिलेश यादव यांच्याप्रमाणे कोणीही त्यांची काळजी घेत नाही, असं राजेंद्र चौधरी यांनी म्हटलं.