केंद्रातील मोदी सरकारने पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. असे असतानाच आता उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारदेखील लवकरच विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कशी नेता येईल, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे लक्ष्य

उत्तर प्रदेश सरकारने प्रस्तावित विशेष अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र हे अधिवेशन ३६ किंवा ४८ तासांचे असू शकते, तसा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारने २०२७ सालापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच ही अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी आराखडा तयार केला आहे. याच विषयावर विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी तेथील सरकार वेगवेगळ्या मुख्य क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. योगी आदित्यनाथ यांच्या या भूमिकेवर विरोधक नेहमीच टीका करतात. विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ यांना वेळोवेळी लक्ष्य केलेले आहे

योगी आदित्यनाथ यांची अखिलेश यादव यांच्यावर टीका

या वर्षीच्या पावसाळी अधिवेशात ११ ऑगस्ट रोजी योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यात याच मुद्द्यावरून जुंपली होती. अधिवेशन सुरू असताना अखिलेश यादव यांनी आपल्या भाषणात योगी आदित्यनाथ यांचे सरकार शेती या क्षेत्राकडे लक्ष न देता लोकांना ‘मोठी स्वप्ने’ दाखवत आहे, अशी घणाघाती टीका केली होती. याच टीकेला उत्तर म्हणून आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांना लक्ष्य केले होते “उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्स करण्यावर आपण सभागृहात ३६ तासांची चर्चा करू. मात्र तुम्ही शास्वत विकासावरील चर्चा नेहमीच टाळलेली आहे. कोणत्याही अडचणीवर उपाय शोधणे सोडा तुम्ही तर नेहमीच अडचणींपासून दूर पळत राहता. आम्ही राज्यातील समस्यांना स्वीकारलेले आहे. तसेच या समस्यांवर उपायही शोधलेले आहेत,” असा पलटवार योगी आदित्यनाथ यांनी केला होता.

संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन

दरम्यान, केंद्र सरकानेदेखील पाच दिवसीय विशेष अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे. या घोषणेंतर्गत १८ ते २२ सप्टेंबर या काळात विशेष अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh cm yogi adityanath likely to call special session to discuss on one trillion dollar economy goal prd
Show comments