खोटे जन्म प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे मोठे नेते आझम खान, त्यांचे पुत्र आणि पत्नी यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आझम खान हे उत्तर प्रदेशमधील मुस्लीम समाजाचे मोठे नेते आहेत. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. आझम खान सध्या सितापूरमधील तुरुंगात आहेत. ते रामपूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. दरम्यान, अजय राय यांच्या या निर्णयामुळे समाजवादी पार्टीचे नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अजय राय, अखिलेश यादव यांच्यात वाद
गेल्या काही दिवसांपासून अजय राय आणि अखिलेश यादव यांच्यात वाद सुरू आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर या वादाला तोंड फुटले. मध्य प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीला जनाधार नाही. त्यामुळे या पक्षाने थेट निवडणूक न लढवता काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन राय यांनी केले होते, तर राय यांना ‘चिरकूट’ म्हणत अखिलेश यादव यांनी त्यांची निर्भर्त्सना केली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांतील वादाने टोक गाठले होते. अखिलेश यादव काँग्रेसवर उघड टीका करत होते. दरम्यान, अजय राय यांनी आझम खान यांची तुरुंगात जाऊन भेट घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही नाराजी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
“समाजवादी पार्टीचे नेते कशाला नाराज होतील?”
आपल्या या भेटीबद्दल अजय राय यांनी प्रतिक्रिया दिली. आझम खान यांची भेट घेतल्यामुळे समाजवादी पार्टी नाराज होईल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “समाजवादी पार्टी आमचा मित्रपक्ष आहे, ते कशाला नाराज होतील. उलट आमची ही भेट विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी चांगली आहे”, असे अजय राय म्हणाले. तसेच आझम खान हे मुस्लीम समाजातील सर्वोच्च नेते आहेत. अखिलेश यादव यांनी त्यांची अद्याप भेट का घेतली नाही, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही, असेही राय म्हणाले. अशा कठीण काळात आम्ही आझम खान यांच्यासोबत आहोत, असा संदेश काँग्रेस या भेटीच्या माध्यमातून मुस्लिमांना देण्याचा प्रयत्न करत आहे.
“मित्रपक्षांची हीच भूमिका असली पाहिजे”
उत्तर प्रदेश काँग्रेसचे सचिव (संघटना) अनिल यादव हेदेखील अजय राय यांच्यासोबत आझम खान यांची भेट घेणार आहेत. त्यांनीदेखील या भेटीवर प्रतिक्रिया दिली. आझम खान तसेच त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही रस्त्यावर लढाई लढू. अशा कठीण काळात आम्ही आझम खान यांच्यासोबत आहोत. मित्रपक्षांची हीच भूमिका असली पाहिजे. आम्ही समाजवादी पार्टीचे मित्रपक्ष आहोत, एका मित्रपक्षाने जे करायला हवे, तेच आम्ही करत आहोत, असे यादव म्हणाले.
अखिलेश यादव यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न
आझम खान यांची भेट घेऊन काँग्रेस पक्ष मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासह या भेटीच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनाही शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जातोय. याआधी समाजवादी पार्टीचे जे नेते तुरुंगात गेलेले आहेत, त्यांची भेट अखिलेश यादव यांनी घेतलेली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून आझम खान हे तुरुंगात आहेत. तरीदेखील अखिलेश यादव यांनी खान यांची तुरुंगात जाऊन भेट घेतलेली नाही. हाच धागा पकडत, खान यांची भेट घेऊन काँग्रेस अखिलेश यादव यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.
अखिलेश यादव यांची काँग्रेसवर टीका
दरम्यान, काँग्रेसच्या या निर्णयावर मात्र अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आझम खान यांची प्रत्येकानेच भेट घ्यायला हवी. मात्र, खान यांना जेव्हा फसवले जात होते, तेव्हा काँग्रेस पक्ष कोठे होता? काँग्रेसचे नेते आझम खान यांना गोवण्यात व्यग्र होते, अशी टीका यादव यांनी केली.