लोकसभेची आगामी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असून त्या दृष्टीने देशातील सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधक केंद्रीय पातळीवर ‘इंडिया आघाडी’च्या रुपात एकत्र आले आहेत. या आघाडीत काँग्रेस, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी यासारख्या महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया आघाडी केली असली तरी राज्य पातळीवर वेगवेगळ्या पक्षांतील मतभेद अद्याप कायम आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. या राज्यात अन्य कोणत्याही पक्षाशी युती करू नये, अशी मागणी या राज्यातील स्थानिक नेत्यांनी केली. तसेच आगामी काळात गांधी परिवारातील एखाद्या सदस्याने उत्तर प्रदेशमध्ये पदयात्रेचे आयोजन करावे, अशीही इच्छा व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणाशीही युती करू नये, काँग्रेसच्या नेत्यांची भावना

उत्तर प्रदेशच्या स्थानिक नेत्यांची गुरुवारी (१६ नोव्हेंबर) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी युती करू नये, अशी भूमिका बैठकीतील नेत्यांनी घेतली. तसेच कोणाशीही युती न करता गांधी घराण्यातील प्रियांका गांधी किंवा राहुल गांधी यापैकी कोणत्याही एका नेत्याने राज्यात पदयात्रा आयोजित करावी, अशी मागणी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी ही मागणी उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्याकडे केली आहे. मध्य प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. जागावाटपाची चर्चा यशस्वी न झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांतर अजय राय आणि अखिलेश यादव यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. सध्या या दोन्ही पक्षांतील वाद पूर्णपणे मिटलेला नाही. अशा स्थितीत आता उत्तर प्रदेश काँग्रेसने कोणत्याही पक्षाशी युती करू नये, अशी भूमिका घेतली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये लवकरच पदयात्रेचे आयोजन- अजय राय

काँग्रेसच्या या बैठकीबाबत अजय राय यांनी सविस्तर माहिती दिली. “युतीसंदर्भातील निर्णय राष्ट्रीय नेते घेतील. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका पदयात्रेचे आयोजन करावे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांना वाचा फोडावी. यामध्ये बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था आदी प्रश्न आहेत, अशी मागणी नेत्यांनी केली. त्यामुळे आगामी काळात अशाच पदयात्रेचे आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. या पदयात्रेचे नेतृत्व आमचे राष्ट्रीय नेते करतील. पक्षाने जनतेचे प्रश्न अधिक प्रखरतेने मांडले पाहिजेत. त्यासाठी तुरुंगात जाण्याचाही तयारी ठेवली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली,” अशी माहिती अजय राय यांनी दिली.

५० टक्के तरुण नेत्यांना संधी दिली जाईल- अजय राय

लवकरच उत्तर प्रदेशमध्ये नव्या कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या नव्या कार्यकारिणीत ५० टक्के तरुण नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता ओबीसी, दलित तसेच मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नेत्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. या नव्या कार्यकारिणीत काही जुन्या तर नव्या नेत्यांना संधी दिली जाईल, असे अजय राय यांनी सांगितले.

पक्षाच्या कार्यक्रमांत सर्वांनी सगभाग नोंदवावा- अजय राय

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत अन्य विषयांवरही चर्चा झाली. या बैठकीत नेत्यांनी पक्षवाढीसंदर्भात वेगवेगळ्या सूचना केल्या. या सर्व सूचनांची दखल घेतली जाईल, असे यावेळी अजय राय यांनी पक्षातील नेत्यांना सांगितले. तसेच दलित गौरव यात्रेप्रमाणे पक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांत सहभाग घ्यावा. लोकसभेची निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र मिळून काम करावे, असे आवाहन यावेळी अजय राय यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केले.

उत्तर प्रदेश सरकार अपयशी- अजय राय

दरम्यान, राय यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची स्थिती चांगली नाही, असा दावा केला. उत्तर प्रदेशच्या सरकारमधील एक उपमुख्यमंत्री सध्या नाराज आहेत. ते शासनाच्या कोणत्याही कार्यक्रमात तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाग घेत नाहीयेत. उत्तर प्रदेशमधील सरकारला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयश आले आहे, असा दावा अजय राय यांनी केला. तसेच सरकारचे हे अपयश जनतेला सांगितले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांकडे केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh congress leaders demand to not do alliance with anyone seeks rahul gandhi priyanka gandhi rally prd