२०२४ साली होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीचे सर्वांनाच वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा, काँग्रेस यासारख्या पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या राज्यांतील स्थानिक पक्षांसोबतच्या युतीची शक्यता पडताळून पाहात आहे. उत्तर प्रदेशमध्येही असाच प्रयत्न सुरू आहे. मात्र येथे काँग्रेसच्या नेत्यांनी समाजवादी पार्टीशी युती न करण्याची भूमिका घेतली आहे. समाजवादी पक्ष वगळता कोणत्याही पक्षाशी युती करायला हरकत नाही, अशी भावना येथील काँग्रेसच्या नेत्यांची आहे.
४ जुलै रोजी लखनौ येथे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समाजवादी पार्टीसोबत युती करावी की नाही? यावर चर्चा करण्यात आली. मात्र लोकांच्या मनात समाजवादी पक्षासंदर्भात नकारात्मक भावना आहे. त्यामुळे या पक्षाशी युती करू नये, अशी भावना काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्ती केली. याबाबत उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ब्रिजलाल खाबरी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सध्यातरी समाजवादी पक्षापासून दूर राहणे योग्य
“समाजवादी पक्षाला मुस्लीम तसेच हिंदू समाजाचे मतदार मतदान करण्याची शक्यता कमी आहे. २०२२ साली ज्या मतदारांनी समाजवादी पार्टीला मतदान केलेले आहे, त्यांचा आता या पक्षावरून विश्वास उडालेला आहे. भाजपाला विरोध करण्यात हा पक्ष अपयशी ठरल्याची मतदारांची भावना आहे. त्यामुळे लोकांची भावना विचारात घेता सध्यातरी समाजवादी पक्षापासून दूर राहणे योग्य आहे, असे काँग्रेसच्या नेत्यांचे मत आहे. २०२२ साली सार्वजनिक सभांमध्ये अखिलेश यादव यांनी मुस्लीम नेत्यांना महत्त्व दिले नव्हते. त्यामुळे मुस्लीम मतदारही त्यांच्यावर नाराज आहेत,” असे खाबरी यांनी सांगितले.
२०१७ साली विस्ताराची संधी मिळाली नाही
काँग्रेस पक्ष कोणाशीही युती न करता आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? असे विचारले असता समाजवादी पक्ष वगळता कोणत्याही पक्षाशी युती करायला हरकत नाही, असे त्यांनी सांगितले. २०१७ साली काँग्रेस पक्षाची समाजवादी पक्षाशी युती होती. मात्र या युतीमुळे काँग्रेस पक्षाला विस्तारासाठी पूर्ण संधी मिळाली नाही, अशी भावना उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आहे.
भारत जोडो यात्रेमुळे मतं वाढणार?
समाजवादी पक्षाने सीएए, एनआरसी कायद्याला विरोध करताना काँग्रेसला पाठिंबा दिला नव्हता. याची उत्तर प्रदेशमधील जनतेला कल्पना आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत उत्साह संचारलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला यावेळी जास्त मतं मिळण्याची शक्यता आहे, असेही खाबरी यांनी सांगितले.
काँग्रेस बहुजन समाज पार्टीशी युती करणार का?
आमचा पक्ष दलित, मुस्लिमांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही खाबरी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, काँग्रेस पत्र बहुजन समाज पार्टीशी युती करणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे त्यांनी थेट उत्तर दिले नाही. हा निर्णय हायकमांड घेईल. मला विचाराल तर अशा प्रकारे युती झाल्यास ती जास्त काळ टिकणारी नसते, असे खाबरी म्हणाले.