गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेस या दोन पक्षांत वाद सुरू आहे. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला काही जागा द्याव्यात, अशी मागणी सपाने केली होती. मात्र त्याला काँग्रेसने विरोध केला होता. त्यानंतर या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर उघड टीका करत होते. असे असतानाच आता उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचा एक बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास या दोन्ही पक्षांत आणखी वाद आणि आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
रवी वर्मा, पूर्वी वर्मा यांचा राजीनामा
उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीचे संस्थापक सदस्य तथा लखीमपूर खेरी या मतदारसंघाचे तीन वेळा खासदार राहिलेले रवी प्रकाश वर्मा यांनी समाजवादी पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते आगामी काळात काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. एकीकडे जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि सपा यांच्यात वाद सुरू असताना रवी प्रकाश वर्मा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या दोन्ही पक्षांतील कटुता वाढण्याची शक्यता आहे. ६३ वर्षीय वर्मा यांनी त्यांची कन्या पूर्वी वर्मा यांच्यासह सपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव यांचा पक्ष आता विचारसरणीपासून दुरावला आहे. आम्हाला पक्ष सोडून जाण्यास भाग पाडले. समाजवादी पार्टी लोकांपासून दुरावली आहे, असा आरोप यावेळी पूर्वी वर्मा आणि रवी वर्मा यांनी केला.
हेही वाचा >>>रोकड, सोने, मद्य आणि अमली पदार्थ; निवडणूक होत असलेल्या पाच राज्यात भरारी पथकाच्या हाती लागले मोठे घबाड
पूर्वी वर्मा एमबीबीएस डॉक्टर
पूर्वी वर्मा या एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यांनी २०१९ साली लखीमपूर खेरी येथून सपाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना भाजपाचे उमेदवार अजय मिश्रा तेनी यांनी पराभूत केले होते. रवी वर्मा हे कुर्मी समजातून येतात. कुर्मी समाजात त्यांचे प्रभुत्व आहे. रवी वर्मा यांचे वडील बालगोविंद वर्मा हे लखीमपूर खेरी या मतदारसंघाचे चार वेळा खासदार राहिलेले आहेत. तसेच इंदिरा गांधी सरकारमध्ये ते मंत्री राहिलेले आहेत. बालगोविंद यांचे १९८० साली निधन झाले. त्यानंतर बालगोविंद यांच्या पत्नी उषा वर्मा याच मतदारसंघातून तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. उषा वर्मा यांच्यानंतर हा राजकीय वारसा रवी वर्मा यांच्याकडे आला. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे नेते अजय मिश्रा तेनी यांनी पूर्वी वर्मा यांना पराभूत केले होते. २०१९ सालीदेखील पूर्वी वर्मा यांचा पराभव झाला होता.
“समाजवादी पार्टी मूल्यांपासून दूर गेली”
समाजवादी पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पूर्वी वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. “अखिलेश यादव यांच्या कामाने प्रभावित झाल्यामुळे मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र समाजवादी पार्टी आता शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचा मुद्दा, महिला सुरक्षा या मूल्यांपासून दूर गेली आहे. लोकांना सर्व गोष्टी समजतात. भाजपा आपल्या नेत्यांना लोकांकडे जायला सांगत आहे. मात्र आमच्या पक्षातील नेते लोकांमध्ये जात नव्हते. पक्ष काही जागांवरच लक्ष देत असेल तर लोकांना हे समजते. या गोष्टी पक्षाला समजत नाहीत, निवडणुकीत मात्र त्याची किंमत चुकवावी लागते,” असे पूर्वी वर्मा म्हणाल्या.
हेही वाचा >>>पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीत बिघाडी? सीपीआय (एम) पक्ष तृणमूलशी युती करणार नाही?
“समाजवादी पार्टीला आता नेत्यांची गरज नाही”
पूर्वी वर्मा यांच्याप्रमाणेच रवी वर्मा यांनीदेखील समाजवादी पार्टीवर टीका केली. “समाजवादी पार्टी आता नेत्यांवर नव्हे तर मॅनेजरवर अवलंबून आहे. एकीकडे भाजपा बूथ समित्यांची स्थापना करत आहे. तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते लखनौचे दौरे करत आहेत,” असे रवी वर्मा म्हणाले.
“समाजवादी पार्टीचे अनेक नेते आमच्या संपर्कात”
सूत्रांच्या माहितीनुसार पूर्वी वर्मा आणि रवी वर्मा यांनी समाजवादी पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी काँग्रेसची चर्चा केली आहे. लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर रवी वर्मा आणि पूर्वी वर्मा यांच्यासह समाजवादी पार्टीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
भाजपाविरोधात लढा लढायला हवा, पण…
दरम्यान, वर्मा यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर समाजवादी पार्टीने प्रतिक्रिया दिली आहे. स्वत:च्या फायद्यासाठी वर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपाचा सामना करण्याऐवजी काँग्रेस मित्रपक्षांची शिकार करत आहे, असे समाजवादी पार्टीने म्हटले आहे. “विरोधकांच्या इंडिया आघाडीचे सदस्य म्हणून भाजपाविरोधात लढा लढायला पाहिजे. काँग्रेस पक्ष आम्हाला आघाडी धर्म शिकवतो. स्वत: मात्र आघाडीचा धर्म विसरून जातो. एकदा आघाडी केल्यानंतर आपल्या मित्रपक्षावर वार केला जात नाही,” अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी काँग्रेसवर केली.
वर्मा यांना आम्ही सर्वकाही दिले पण..
“आम्ही वर्मा यांना सर्वकाही दिले. आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवले. त्यांना पक्षाचे सरचिटणीसपद दिले. त्यांना हवा असलेला आदर, प्रतिष्ठा दिली. वर्मा आणि काँग्रेस पक्ष जे काही करत आहेत, ते चुकीचे आहे,” असेही चौधरी म्हणाले.