कुख्यात गुंड आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकारण तापले आहे. येथे समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी तसेच इतर विरोधी पक्षांकडून भाजपा आणि योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान, हाच मुद्दा घेऊन भाजपाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी प्रचार केला जात आहे. उत्तर प्रदेश भाजपाने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्याकडून अतिक अहमदसारख्या गुंडांना संरक्षण देण्यात येते, असा आरोप भाजपाने केला आहे. अखिलेश यादव पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील रामभक्तांना मारले जाईल, असा प्रचारही भाजपाकडून केला जात आहे.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेनेच्या उमेदवारीने विधानसभा निवडणुकीत सीमाभागात संभ्रम
व्हिडीओमध्ये अखिलेश यादव यांचा अतिक अहमदसोबतचा फोटो
उत्तर प्रदेश भाजपाने त्यांच्या ट्विटरवर ४.२४ मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपा अखिलेश यादव यांना लक्ष्य करीत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये टोपी घातलेले अखिलेश यादव अतिक अहमद आणि सध्या तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांच्यासोबतचा एक फोटो दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये “मुझफ्फरनगरमधील दंगल तुमच्यामुळेच झाली. अतिक आणि मुख्तार अन्सारी यांचे साम्राज्य तुमच्यामुळेच वाढले. तुम्हीच गुन्हेगारांना नेता बनवलं. तुमच्यामुळेच गौरव आणि सचिन यांचा मृत्यू झाला,” असे या व्हिडीओतील गाण्यात सांगण्यात आले आहे. २०१३ सालच्या मुझफ्फनगरमधील दंगलीत गौरव आणि सचिन यांचा मृत्यू झाला होता. या वेळी उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचे सरकार होते.
हेही वाचा >> Karnataka Election 2023 : जगदीश शेट्टर की महेश तेंगिनाकायी? हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघात कोण बाजी मारणार?
अखिलेश यादव समाजवादी विचारांपासून दूर गेले, भाजपाचा दावा
अखिलेश यादव त्यांच्या पक्षाच्या, जयप्रकाश नारायण यांच्या विचारांपासून दूर जात आहेत, असा दावाही या व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे. “उत्तर प्रदेशला ज्यांनी लुटले, तो नेता तुम्हीच आहात. जयप्रकाश नारायण यांच्या स्वप्नांना अधुरे सोडणारे तुम्हीच आहात,”असेही या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. भाजपाने अखिलेश यादव यांना समाजवादाचा थोतांड चेहरा असेही म्हटले आहे.
भाजपा चारित्र्यहनन करणारी संस्था- समाजवादी पार्टी
भाजपाने जारी केलेल्या या व्हिडीओवर समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा हा पक्ष रस्त्यावरील गुंडासारखा वागत आहे. भाजपा हा पक्ष आता चारित्र्यहनन करणारी संस्था झाली आहे,” असे समाजवादी पक्षाचे नेते शिवपाल यादव म्हणाले. “समाजवादी पक्षात लोकशाही, समानता आणि एकता ही तत्त्वे रुजलेली आहेत. पक्षाला बदनाम करण्यासाठी दडपशाहीचा वापर करून अनेक कट रचले जात आहेत. मात्र तरीदेखील आम्ही ताठ मानेने उभे राहू. राज्याचा विकास व्हावा यासाठी अखिलेश यादव यांच्याकडे लोक आशेने पाहात आहेत,” असे शिवपाल यादव म्हणाले.
हेही वाचा >>ग्रामीण भागात पर्याय निर्माण करण्यावर चंद्रशेखर राव यांचा भर
भाजपाने फोडला प्रचाराचा नारळ
दरम्यान, अखिलेश यादव यांच्यावर आरोप करणारा व्हिडीओ प्रदर्शित केल्यानंतर त्याच दिवशी भाजपाने योगी आदित्यनाथ यांची वाहवा करणारा दुसरा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला. या व्हिडीओच्या माध्यमातून भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.