समाजवादी पार्टीला सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नवा स्टार प्रचारक मिळाला आहे. अखिलेश यादव यांची कन्या अदिती प्रचारासाठी मैदानात उतरली असून ती सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. अदिती आपली आई डिम्पल यादव यांच्यासाठी मते मागत पक्षाचा प्रचार करते आहे. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव या उत्तर प्रदेशमधील मैनपुरी मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. याच जागेवरून त्या निवडणूक लढवत आहेत. मैनपुरी हा समाजवादी पार्टीचा पारंपरिक मतदारसंघ असून मुलायमसिंह यादव यांचा बालेकिल्ला राहिला आहे. २१ वर्षे वयाची अदिती ही राजकीय आखाड्यात उतरलेल्या यादव घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील सदस्य आहे. निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या अदितीने लोकांचे लक्ष कशाप्रकारे वेधून घेतले आहे, ते आता आपण पाहणार आहोत.

कोण आहे अदिती यादव?

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, अदितीने लखनौच्या ला मार्टिनियर कॉलेजमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तिने इयत्ता बारावीमध्ये ९८ टक्के गुण प्राप्त केले होते. सध्या ती युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये पुढील शिक्षण घेत आहे. अदितीला बॅडमिंटन आणि घोडेस्वारीची आवड आहे.

Congress Priyanka Gandhi road show today in West Nagpur and Gandhi Gate, Mahal in Central Nagpur
प्रियंका गांधी यांची प्रतीक्षाच, पण बघ्यांची मोठी गर्दी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
dadar mahim vidhan sabha
दादर – माहीम विधानसभेत भाजपचा मनसेला अप्रत्यक्ष पाठिंबा ? भाजपच्या महिला विभाग अध्यक्षच्या फेसबुक पोस्टमुळे उलटसुलट चर्चांना उधाण
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन; विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय चर्चा…
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
Pune People Representative, Pune Municipality,
नेता कोणाला म्हणायचे?
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन

हेही वाचा : जातीय हिंसाचारामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला; कर्नाटकमध्ये काँग्रेस अडचणीत?

आईसाठी अदिती यादव प्रचाराच्या रिंगणात

मैनपुरी मतदारसंघात अदितीचा उल्लेख घर की बिटिया असा केला जात आहे. ती २० मार्च रोजी आपल्या आईबरोबर प्रचार करताना पहिल्यांदा दिसून आली. मुलायम सिंह यादव मैनपुरी मतदारसंघामधून १९९६, २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करून संसदेत गेले होते. त्यामुळे समाजवादी पार्टीसाठी हा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. अदिती गेल्या महिनाभरापासून या मतदारसंघात आपल्या आईच्या प्रचारासाठी कोपरा सभांना संबोधित करते आहे. २०२२ मध्ये मुलायम सिंह यादव यांचे निधन झाल्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांचा २,८८,४६१ मतांनी पराभव करत ही पोटनिवडणूक जिंकली. २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत डिम्पल यादव यांच्यासमोर भाजपाच्या जयवीर सिंह ठाकूर आणि बसपाच्या शिवप्रसाद यादव यांचे आव्हान आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी या मतदारसंघाचे मतदान पार पडणार आहे.

द प्रिंटच्या वृत्तानुसार, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी भारतात आलेली अदिती उत्तर प्रदेशमधील कडक तापमानामध्ये आपल्या आईचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरली आहे. ती स्थानिक लोकांच्या भेटीगाठी घेत आहे, तसेच लहान सभांना संबोधित करत आहे. हार, पुष्पगुच्छ आणि काही ठिकाणी डोक्यावर पगडी घालून तिचे स्वागत केले जात आहे. मैनपुरी लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे पाच मतदारसंघ येतात. अदिती करहल आणि किश्नी विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक प्रचार करताना दिसते आहे.

३० एप्रिल रोजी किश्नीमधील एका सभेत अदिती म्हणाली की, “मैनपुरी हे माझे घर आहे आणि तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात. मी जिथे जात आहे, तिथे मला मुलीप्रमाणे प्रेम मिळत आहे. हा आपलेपणा दाखवण्यासाठी मी आपले आभार व्यक्त करते.” प्रचारादरम्यान आपल्या भाषणांमध्ये अदिती अनेक राजकीय विषयांनाही हात घालताना दिसत आहे. समाजवादी पार्टी महिलांचे सक्षमीकरण, तरुणांसाठी रोजगार निर्मिती आणि मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करेल, असे वचन ती देत आहे.

अदिती प्रचारामध्ये उतरल्यामुळे लोकांमधून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. न्यूज १८ शी बोलताना एका स्थानिक रहिवाश्याने म्हटले की, “अदिती माझ्या मुलीसारखीच आहे. डिम्पल यादव चार लाख मताधिक्याने ही निवडणूक नक्कीच जिंकतील.” समाजवादी पार्टीचे तरुण कार्यकर्ते पियुष यादव म्हणाले की, “या कडाक्याच्या उन्हाळ्यातही अदिती दररोज सहा-सात तास प्रचार करत आहेत. त्यांच्या मतांमध्ये आणि विचारांमध्ये स्पष्टता आहे. त्या प्रचारात उतरल्या नसत्या तरी फार फरक नसता पडला; मात्र, त्यांची उपस्थिती लोकांना आवडत आहे. त्या सर्वांना माहिती असल्या तरी या माध्यमातून त्यांची विशेष ओळख प्रस्थापित होत आहे.”

मुलायम सिंह यादव यांच्याबरोबर तुलना

अदिती तळागाळात जाऊन प्रचार करत असल्यामुळे तिला पाहून लोकांना मुलायम सिंह यांची आठवण होत आहे. मैनपुरी मतदारसंघातील रहिवासी बद्रीनाथ यादव म्हणाले की, “यावेळी पहिल्यांदाच लोकांनी अदिती यांना पाहिले आहे. त्या त्यांच्या वडिलांसारख्याच दिसतात. अदिती ज्या पद्धतीने लोकांना भेटतात, त्यांचे म्हणणे ऐकून घेतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात, ते पाहून त्यांचे आजोबा मुलायम सिंह यादव यांची आठवण होते. मुलायम सिंह यादवही त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जायचे.”

राजकारणाच्या रिंगणात उतरणार का अदिती?

अदिती यापूर्वी कधीही प्रचार करताना दिसली नव्हती. मात्र, आता तिच्या भविष्यातील राजकीय प्रवेशाविषयी चर्चा होताना दिसत आहेत. समाजवादी पार्टीकडून याबाबत अद्याप कसलीही घोषणा करण्यात आलेली नाही. डिम्पल यादव यांनी न्यूज १८ शी बोलताना म्हटले आहे की, “अदिती फक्त प्रचार करत नसून ती तळागाळात जाऊन स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. ती लोकांच्या घरी जाऊन भेटते आहे, तसेच त्यांच्याबरोबर वेळ घालवते आहे.” अदिती राजकीय आखाड्यात उतरणार का, या प्रश्नावर डिम्पल यादव म्हणाल्या की, “तिचे निर्णय घेण्यासाठी ती स्वतंत्र आहे. मी नेहमीच माझ्या मुलांना पाठिंबा दिला आहे. राजकारण अथवा इतर कशामध्ये आपले करिअर करायचे याबाबतचा निर्णय ती स्वत:च घेईल.”

हेही वाचा : राजकारणात येण्यासाठी भाजपाचीच निवड का केली? उज्ज्वल निकम यांनी सांगितले खरे कारण

भाजपाकडून घराणेशाहीचा आरोप

भाजपाकडून समाजवादी पार्टीवर नेहमीच घराणेशाहीचा आरोप केला जातो. आता अदिती यादव प्रचारामध्ये उतरल्यामुळे भाजपाने यावरही टीका केली आहे. अखिलेश यादव यांच्या विश्वासू सहकारी निधी यादव यांनी एके ठिकाणी प्रचार करताना म्हटले आहे की, अदिती यांच्या उपस्थितीचा धसका घेऊन भाजपा आपल्या वरिष्ठ नेत्यांना प्रचारासाठी पाठवत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचारसभा या मतदारसंघात झाल्या आहेत. अमित शाह यांनी समाजवादी पार्टीवर घराणेशाहीचा आरोप करत एका प्रचारसभेत म्हटले की, “आपण यादव समाजाच्या पाठिशी उभे असल्याचे चित्र समाजवादी पार्टी उभे करते. मात्र, निवडणुकीत उमेदवारी देताना त्यांना फक्त आपले कुटुंब आठवते. घराणेशाही असलेला हा पक्ष आता संपवण्याची वेळ आली आहे.”
या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या घराण्यातील पाच सदस्य लोकसभा निवडणूक लढवत आहेत. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (कन्नौज), डिम्पल यादव (मैनपुरी), धर्मेंद्र यादव (आझमगड), आदित्य यादव (बदायूं) आणि अक्षय यादव (फिरोजाबाद) निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.