२०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष देशपातळीवर एकत्र आले आहेत. या आगाडीला विरोधकांनी ‘INDIA’ असे नाव दिले आहे. आघाडीतील पक्षप्रमुखांची लवकरच मुंबई येथे तिसरी महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, एकीकडे विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकत्र येत असले तरी दुसरीकडे राज्य पातळीवर मात्र काहीशी वेगळी स्थिती आहे. अगोदर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातील मतभेद समोर आले होते. त्यानंतर आता पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावर समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
समाजवादी पार्टीने आघाडी धर्म पाळला नाही
उत्तर प्रदेशमध्ये घोसी या मतदारसंघासाठी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आघाडी धर्म पाळत काँग्रेसने या ठिकाणी आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे समाजवादी पार्टीच्या उमेदवाराची विजयाची शक्यता वाढली आहे. उत्तराखंडमध्ये बागेश्वर या जागेसाठी मात्र समाजवादी पार्टीने आघाडीचा धर्म पाळलेला नाही. या जागेसाठी समाजवादी पार्टीने आपला उमेदवार उभा केला आहे.
भाजपा आमदाराच्या निधनामुळे पोटनिवडणूक
विधानसभेच्या बागेश्वर या जागेवर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढाई होणार आहे. या मतदारसंघासाठी येत्या ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही जागा अगोदर भाजपाकडे होते. भाजपाचे आमदार चंदनराम दास यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक आयोजित करावी लागत आहे. भाजपाने या जागेवर चंदनराम यांच्या पत्नी पार्वती दास यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने बसंत कुमार यांना उमेदवारी दिली आहे. बसंत कुमार यांनी २०२२ साली आम आदमी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. याच जागेवर समाजवादी पार्टीनेही भगवती प्रसाद त्रिकोटी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी २०१४ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत ते पराभूत झाले होते.
मतविभाजन होण्याची काँग्रेसला भीती
काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर झालेल्या आघाडीला लक्षात घेता उत्तर प्रदेशमधील घोसी मतदारसंघासाठी उमेदवार दिलेला नाही. उत्तराखंडमधील बागेश्वर जागेसाठीही समाजवादी पार्टी उमेदवार देणार नाही, अशी काँग्रेसला अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र समाजवादी पार्टीने या जागेसाठी उमेदवार दिल्यामुळे येथील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. या जागेवर मतविभाजन होण्याची काँग्रेसला भीती आहे.
“समाजवादी पार्टी अर्ज मागे घेईल अशी आशा”
याबाबत काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष मथुरा दत्त जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “२१ ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. समाजवादी पार्टी आपल्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्याचा आदेश देईल, अशी आम्हाला आशा आहे. समाजवादी पार्टीच्या या निर्णयामुळे देशपातळीवर झालेल्या इंडिया या आघाडीसंदर्भात चुकीचा संदेश जात आहे,” असे जोशी म्हणाले.
“आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार”
दुसरीकडे समाजवादी पक्ष मात्र आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास तयार नाही. ही निवडणूक लढवण्यावर उत्तराखंडमधील नेतृत्व ठाम आहे. याबाबत समावादी पक्षाचे उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष एस. पी. पोखरीयाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रीय पातळीवर झालेली आघाडी कायम आहे. मात्र बागेश्वर या भागात आमचा पक्ष बळकट व्हावा म्हणून आम्ही तेथे निवडणूक लढवत आहोत. आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्जा मागे घेणार नाहीत. आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत,” असे पोखरियाल यांनी सांगितले.
काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत
समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनीदेखील अशीच भूमिका घेतली आहे. सध्यातरी देशपातळीवर होत असलेल्या आघाडीमध्ये जागावाटप झालेले नाही. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार उभा केला आहे, असे चौधरी म्हणाले. दरम्यान, बागेश्वर या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात थेट लढत होणार आहे. समाजवादी पार्टीला उत्तराखंडमध्ये जनाधार नाही. त्यामुळे या निवडणुकीत या पक्षाला किती मते मिळणार आणि काँग्रेसला फटका बसणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
विभाजनाआधी समाजवादी पार्टीला जनाधार, आता मात्र….
२०२२ साली झालेल्या विधानसभा निवडवणुकीत या जागेवर समाजवादी पक्षाला अवघी ५०८ मते मिळाली होती. तर भाजपाने काँग्रेसच्या रंजित दास यांचा पराभव केला होता. भाजपाचे उमेदवार चंदनराम दास यांना एकूण ४३.१४ टक्के मते मिळाली होती. उत्तर प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर २००० साली उत्तराखंड या राज्याची निर्मिती झाली. जेव्हा उत्तराखंड हे राज्य उत्तर प्रदेशचाच भाग होते, तेव्हा या प्रदेशातून समाजवादी पार्टीचा काही जागांवर विजय झाला होता. मात्र विभाजनानंतर समाजवादी पार्टी उत्तराखंडमध्ये विशेष कामगिरी करू शकलेली नाही. २००४ साली लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने हरिद्वार या मतदारसंघातून विजय मिळवला होता.