अयोध्येनंतर (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) आता भाजपाला बद्रीनाथ विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीमध्ये दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने देशभर चर्चा रंगली आहे. काल देशभरात ७ राज्यांमधील १३ विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये १० जागांवर इंडिया आघाडीला तर भाजपाला फक्त २ जागांवर यश मिळाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास, उत्तराखंडसारख्या राज्यामध्ये सलग तिसऱ्यांदा सर्वच्या सर्व लोकसभा जागांवर भाजपाने विजय मिळवला असून राज्यातही भाजपाचीच सत्ता आहे. असे असूनही काँग्रेसने उत्तरखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलौर या दोन विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये यश मिळवले आहे. या विजयामुळे राज्यामध्ये विजनवासात गेलेल्या काँग्रेसला उभारी मिळाली असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे उमेदवार लखपत सिंह बुटोला यांनी बद्रीनाथ जागेवर भाजपाच्या राजेंद्र सिंह भंडारी यांचा ५,२२४ मतांनी पराभव केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे भंडारी यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळेच ही पोटनिवडणूक झाली होती. मंगलौर विधानसभा मतदारसंघामध्ये काझी निझामुद्दीन यांनी फक्त ४२२ मतांनी निसटता विजय मिळवला. ते याआधी तीनवेळा आमदार राहिलेले असून त्यांनी भाजपाच्या करतार सिंह भडाना यांचा पराभव केला. बसपाचे उमेदवार उबैदूर रहमान तिसऱ्या स्थानी राहिले. बसपाचे आमदार सरवत करीम अन्सारी यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिकामी झाली होती; त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. एकीकडे अयोध्येनंतर आता बद्रीनाथमध्येही पराभव पत्करावा लागल्यामुळे लोक आता भाजपाच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला नाकारत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे; तर दुसरीकडे पोटनिवडणुकीतील या विजयाकडे काँग्रेसचे राज्यातील पुनरुज्जीवन म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा : पक्षांतर, योजनांची खैरात नि जातींची समीकरणे; हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय सुरु आहे?

काँग्रेसचे पुनरुज्जीवन

उत्तराखंडमध्ये सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील पाचही लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. उत्तराखंडमध्ये आपले काय चुकते आहे, याचे विश्लेषण उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीने (UPCC) केले आहे. त्यानुसार, पक्षाच्या नेत्यांमधील समन्वय, सुसंवाद आणि ताळमेळ यांच्या अभावामुळेच राज्यातील पाचही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पक्षाने काढला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये २०१७ व २०२२ अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले आहे. मात्र, अलीकडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फक्त पराभवच झालेला नाही तर मतटक्काही प्रचंड घसरला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ३८ टक्के मते मिळवली होती. या लोकसभा निवडणुकीमध्ये हा मतटक्का ३२.८३ टक्क्यांवर घसरला आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकूण ७० विधानसभा जागांपैकी १९ जागांवर विजय मिळविता आला होता. मात्र, याहून गंभीर बाब अशी आहे की, या लोकसभा निवडणुकीमध्ये २०२२ मध्ये जिंकलेल्या १९ विधानसभा जागांमधील १४ जागांवर काँग्रेस पिछाडीवर राहिलेली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने असा दावा केला होता की, राज्यातील लोकसभेची निवडणूक जर नंतरच्या टप्प्यामध्ये घेण्यात आली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. काँग्रेसचा हाच दावा आता पोटनिवडणुकीतील विजयाद्वारे सिद्ध होताना दिसत आहे.

काँग्रेसच्या गरिमा मेहरा दसौनी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले होते की, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये राज्यातील निवडणूक पार पडल्याचा उत्तराखंड काँग्रेसला फटका बसला. कारण, निवडणुकीतील वारे बदलण्याचे परिणाम नंतरच्या टप्प्यात झालेल्या मतदारसंघांमध्ये दिसून आले. तसेच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासने आणि वचने लोकांपर्यंत पोहोचायलाही वेळ लागला. पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही जागांवर विजय प्राप्त केल्यानंतर शनिवारी (१३ जुलै) दसौनी म्हणाल्या की, राज्यात काँग्रेस पुनरुज्जीवीत होत आहे, याचे हे संकेत आहेत. मंगलौर विधानसभा जागेवरील पोटनिवडणूक अनेक अर्थांनी विशेष मानली जात होती. उत्तराखंडमध्ये भाजपा आणि काँग्रेस हे दोन पक्ष सामर्थ्यवान असले तरीही या विधानसभा मतदारसंघामध्ये बसपाचे वर्चस्व होते. उत्तराखंड राज्य स्थापन झाल्यापासून आजपर्यंत कधीही भाजपाला या जागेवर विजय मिळवता आलेला नाही. बसपाचे आमदार सरवत करीम अन्सारी यांचे निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र उबैदूर रहमान यांनाच बसपाकडून तिकीट देण्यात आले होते. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असली तरीही ही जागा काँग्रेसला जिंकता आली. भाजपाला ही जागा जिंकता आलेली नसली तरीही या मतदारसंघामध्ये विजयाच्या जवळ जाणारी मते भाजपाला पहिल्यांदाच प्राप्त झाली आहेत. २००२ च्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये, बसपाच्या तिकिटावर लढणाऱ्या काझी निझामुद्दीन यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या सरवत करीम अन्सारी यांचा पराभव केला होता. २००७ च्या निवडणुकीमध्ये, निझामुद्दीन (बसपा) यांनी रालोदच्या चौधरी कुलवीर सिंह यांचा पराभव केला होता; तेव्हा अन्सारी (काँग्रेस) तिसऱ्या स्थानी राहिले होते. २०१२ मध्ये अन्सारी (बसपा) यांनी निझामुद्दीन (काँग्रेस) यांचा पराभव केला. २०१७ मध्ये पुन्हा एकदा निझामुद्दीन (काँग्रेस) यांनी जागा जिंकली; मात्र, २०२२ च्या निवडणुकीमध्ये ५९८ मतांनी त्यांचा सरवत करीम अन्सारी (बसपा) यांनी पराभव केला होता.

हेही वाचा : ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?

भाजपाला दणका

२०२२ च्या निवडणुकीत भाजपाने बद्रीनाथ आणि मंगलौर या दोन्ही जागा गमावल्या होत्या. या पोटनिवडणुकीमध्ये एकही जागा मिळवण्यात अपयशी ठरणे हा पक्षासाठी मोठा धक्का आहे. चारधाम यात्रा आणि देव भूमी उत्तराखंडमधील धार्मिक पर्यटनाला सरकारने बरीच चालना दिली होती, त्यामुळे बद्रीनाथ जागेवर विजय मिळेल, अशी भाजपाला अपेक्षा होती. बद्रीनाथ हा गढवाल लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या १४ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ जिंकला होता, तर बाकी सगळे भाजपाकडे गेले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand bypoll wins congress eyes revival as bjp reels from badrinath loss vsh
Show comments