मार्चमध्ये झालेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी -‘आप’ ने जोरदार हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली राज्यांच्या यशाच्या पार्श्वभुमिवर चांगले प्रशासन, मोफत वीज आणि पाणी अशा घोषणा आपने केल्या होत्या. पण मतदारांनी आपला पुर्णपणे नाकारले, आपचा एकही आमदार निवडून आला नाही. ३.३१ टक्के एवढीच मते आपच्या पारड्यात मतदारांनी टाकली, पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. निवडणुकीतील अपयशाच्या धक्क्यातून सावरायच्या आतच उत्तराखंडमध्ये ‘आप’ला मोठे धक्के बसले असून आता पक्षाला राज्यात चेहराच राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
उत्तराखंडचे ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष दिपक बाली यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी भाजपात प्रवेश केला. या कार्यक्रमाला स्वतः उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी , भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक उपस्थित होते. सोमवारी दिपक बाली यांनी आपचा राजीनामा दिला. ‘आप’ पक्षाची कार्यशैली पसंत पडत नाही आणि यामुळे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’ असं त्यांनी एक पत्र ट्वीट्रवर पोस्ट केले.
आप पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले (निवृत्त) कर्नल अजय कोठियाल आणि आपचे कार्यकारी अध्यक्ष भुपेश उपाध्याय यांनी गेल्याच महिन्यात आपचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. आता बाली यांच्या भाजपातील प्रवेशामुळे उत्तराखंडमधून आपचे अस्तित्व पुसले गेल्याची प्रतिक्रिया पुष्कर सिंह धामी दिली.
” राजकारणातील कारकीर्द सुरु करण्यापूर्वी मी व्यवसाय आणि समाजकारणात काम करायला सुरुवात केली. आपमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर मी पूर्णवेळ आपसाठी दिला. भविष्याचा वेध घेणाऱ्या, विकासाचे व्हिजन असलेल्या धामी यांच्या कामामुळे मी प्रभावित झालो होतो. आज मी भाजपात प्रवेश करत आहे. चंपावत पोटनिवडणुकीत ९२ टक्के मते मिळवत भाजपाने ज्याप्रकारे विजय मिळवला आहे मी स्वतःला भाजपात प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाही. चार वर्षांपूर्वी पाकिस्तानमधील एका हिंदू महिलेवर अत्याचार करण्यात आले, हनुमान मंदिर हे पाडण्यात आल्याचा व्हिडीओ वायरल झाला. त्यावेळी आपच्या नेतृत्वाने धारण केलेले मौन हे मला धक्का देणारे होते. तेव्हा फक्त देशाचे नाव घेणे म्हणजे राष्ट्रभक्ती नाही हे माझ्या लक्षात आले” अशी प्रतिक्रिया बाली यांनी राजीनामा दिल्यावर भाजपात प्रवेश करतांना दिली.
अजय कोठियाल, भुपेश उपाध्याय आणि त्यांच्या पाठोपाठ दिपक बाली यांनी भाजपात प्रवेश केल्याने उत्तराखंडमध्ये आम आदमी पार्टीला चेहराच राहिलेला नाही, राज्य पातळीवर पक्षाचे नेतृत्व करु शकेल असा नेताच आपमध्ये उरलेला नाही. त्यामुळे उत्तराखंडमध्ये विधानसभा निवनडुकीनंतर ‘आप’ला मोठे हादरे बसले असून तिथे पक्षाच्या अस्तित्वाचाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.