आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार, ४०० पार’चा नारा दिला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. उत्तरप्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत ज्या १४ जागांवर भाजपाला पराभव स्वीकारावा लागला, त्या जागांवर भाजपाचे विशेष लक्ष आहे. आगामी निवडणुकांमध्ये या जागा जिंकण्याच्या उद्देशाने भाजपाने या जागांवर केंद्रीय नेत्यांना तयारीसाठी उतरवले आहे. यासाठी भाजपाने विशेष रणनीती तयार केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तरप्रदेशमध्ये ८० पैकी ६२ जागा स्वबळावर जिंकल्या, तर युतीतील त्यांचा मित्रपक्ष अपना दलने २ जागा जिंकल्या. या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाला (बसप) १० जागा आणि त्यांच्या तत्कालीन युतीतील समाजवादी पार्टी (सपा)ने ५ आणि काँग्रेसने केवळ एक जागा जिंकली.
उमेदवारांची निवड करणे भाजपासाठी आव्हान
त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सपाशासित आझमगड आणि रामपूर या दोन जागांवर भाजपाचा विजय झाला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे नसणार्या १४ जागांमध्ये गाझीपूर, लालगंज, नगीना, अमरोहा, बिजनौर, आंबेडकर नगर, सहारनपूर, घोसी, श्रावस्ती, जौनपूर, संभल, मुरादाबाद, मैनपुरी आणि रायबरेली यांचा समावेश आहे. भाजपाच्या सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, या जागांवर जातीय समीकरणांचा आढावा घेत, उमेदवारांची निवड करणे पक्षासाठी मोठे आव्हान आहे.
भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, मतदारांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी, या १४ जागांवर पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, यासाठी पक्षाने ‘संपर्क अभियान’ हाती घेतले आहे. या अभियानाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, याची माहिती कार्यकर्त्यांकडून मागवण्यात येत आहे. भाजपाने अश्विनी वैष्णव, अन्नपूर्णा द्विवेदी आणि जितेंद्र सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांना या मतदारसंघांना भेट देण्याचे आणि तळागाळातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत.
“आम्ही या १४ जागा गमावल्या होत्या. परंतु, यामागचे कारण शोधण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. केंद्रीय मंत्र्यांना कार्यकर्ते आणि योजनेच्या लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे,” असे भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी सांगितले. आतापर्यंत नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी केलेल्या चर्चेच्या आधारावर भाजपाने १४ जागांपैकी सहा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
१४ पैकी ६ जागांवर उमेदवार जाहीर
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लालगंज जागेवर भाजपाने नीलम सोनकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्यावेळी नीलम सोनकर यांचा बसप नेत्या संगीता आझाद यांच्याकडून १.६१ लाख मतांनी पराभव झाला होता. बसपाच्या विद्यमान खासदार संगीता आझाददेखील आता भाजपात सामील झाल्या आहेत. गेल्यावेळी जौनपूरमधून बसपचे शिवम सिंह यादव यांनी भाजपाच्या एन.पी. सिंह यांचा ८० हजार मतांनी पराभव केला होता. यंदा भाजपाने काँग्रेसचे माजी नेते कृपाशंकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. कृपाशंकर मुळचे जौनपूरचे आहेत. त्यामुळे भाजपाला विश्वास आहे की, यंदा ही जागा भाजपा जिंकेल.
भाजपाने अमरोहामधून कंवर सिंग तोमर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत तत्कालीन बसप उमेदवार दानिश अली यांनी ६३ हजार मतांनी त्यांचा पराभव केला होता. पक्षाला आशा आहे की, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) सोबतची युती, पक्षासाठी फायद्याची ठरेल. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बसपमधून दानिश अली यांना निलंबित करण्यात आले होते. बुधवारी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते आता काँग्रेसच्या तिकीटावर अमरोहा येथून निवडणूक लढवणार आहेत. ही जागा समाजवादी पक्षाने (एसपी) जागावाटप कराराचा भाग म्हणून काँग्रेसला दिली होती.
आंबेडकर नगरमधील विद्यमान बसप खासदारदेखील भाजपामध्ये सामील झाले. रितेश पांडे यांनी गेल्या महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांनी भाजपाच्या मुकुट बिहारी यांचा ९५ हजार मतांनी पराभव केला होता. ते आता या जागेवरून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. २०१९ मध्ये, बसपचे खासदार राम शिरोमणी यांनी श्रावस्ती या जागेवर भाजपाच्या दद्दन मिश्रा यांचा केवळ ५,३२०मतांनी पराभव केला होता. भाजपाने आता या जागेवरून साकेत मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे.
नगीना जागेवर बसपच्या गिरीश चंद्राकडून भाजपाचा १.६६ लाख मतांनी पराभव करण्यात आला होता. यंदा पक्षाने ही जागा नहटौरचे विद्यमान आमदार ओम कुमार यांना दिली आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. सपाने या जागेवरून मनोज कुमार यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा : बलात्कार प्रकरणातील आरोपीची पाठराखण करणारा ‘हा’ भाजपाचा नेता काँग्रेसमध्ये; कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास
काँग्रेसच्या बालेकिल्ला रायबरेलीतून भाजपाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, रायबरेलीमध्ये भाजपाने स्थानिक काँग्रेस आणि सपा नेत्यांना सामील करून घेतले आहे. २०१९ मध्ये बसपा-एसपी-आरएलडी यांची युती होती. आता ही युती नसल्यामुळे या १४ जागांवर भाजपाची शक्यताही उजळली आहे.