उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी काही काळासाठी राजकीय विश्रांती घेतली होती. या विरामानंतर आता समाजवादी पक्ष (एसपी) आणि बहुजन समाज पक्ष (बसपा) हे दोन प्रमुख विरोधी पक्ष सक्रिय झाले आहेत. या दोन्ही पक्षांनी राज्याच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. असं असूनही काँग्रेस मात्र उत्तर प्रदेशात अजूनही शांत असल्याचे पहायला मिळत आहे. अजूनही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. माजी आमदार अजय कुमार लल्लू यांनी मार्चमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर यूपी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेवसला फक्त २.३३ टक्के मते मिळवता आली होती. देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या राजकीय पक्षाची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी होती.
तत्कालीन काँग्रेस प्प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांचा कुशीनगर जिल्ह्यातील तमकुही राज मतदारसंघातून पराभव झाला होता. त्यानंतर लल्लू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. आता या घटनेला साडे तीन महिने उलटूनसुद्धा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेतृत्त्वाने नवीन प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केलेली नाही. अलीकडेच झालेल्या आझमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारच उभे केले नव्हते. यामुळे काँग्रेसची पारंपरिक मते इतर पक्षांकडे वळण्याची शक्यता असल्याचे पक्षाच्या अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी-मार्च महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या वेळी यूपीच्या प्रभारी आणि एआयसीसीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी पक्षाच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत होत्या. वेगवेगळ्या घटनांमधील पीडितांना भेटण्यासाठी यूपीच्या विविध भागांमध्ये नियमितपणे प्रवास करत होत्या. पण निवडणूकीत पराभव झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आतापर्यंत फक्त एकदाच पक्षाच्या बैठकीसाठी यूपीला भेट दिली आहे.
यूपी काँग्रेसचे प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी दावा केला की, पक्ष नेतृत्व पुढील काही दिवसांत उत्तर प्रदेशात पक्षाच्या नवीन प्रमुखाची घोषणा करेल. राजपूत यांनी पक्ष निष्क्रिय असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पक्ष सार्वजनिक प्रश्नांवर सक्रिय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “आम्ही उदयपूर येथील चिंतन शिबिरादरम्यान घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करत आहोत आणि त्यानुसार कार्यक्रम आखले जात आहेत,” असा त्यांनी दावा केला आहे.