उत्तराखंड सरकारने प्रसिद्ध असणाऱ्या कावड यात्रेसाठी यंदा प्रथमच अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. उत्तराखंड सरकारने बुधवारी कावड यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यात्रेकरूंचे पाय धुत त्यांचे स्वागत केले.हरिद्वारमध्ये गंगा नदीच्या काठावर आयोजित एका कार्यक्रमात धामी यांनी यात्रेकरूंचे आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना ते म्हणाले की “प्रत्येक कावडियामध्ये भगवान शिवाचा अंश आहे”. कोविडमुळे दोन वर्षांच्या अंतरानंतर कावड यात्रा आयोजित केली जात आहे. त्यामुळे उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री धूमधडाक्यात यात्रेकरुंचे स्वागत करत आहेत.
पोलिस उप अधिक्षक धामी म्हणाले की ” त्यांना यावर्षी सुमारे पाच कोटी कावड यात्री येण्याची अपेक्षा आहे. हा एक विक्रम प्रस्थापित होणार आहे. म्हणूनच सरकारने यात्रेसाठी चांगल्या सुविधा आणि सुरळीत व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे”. “चारधाम यात्रेप्रमाणेच यंदाही विक्रमी संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत २७ लाखांहून अधिक लोक चारधाम यात्रेत सहभागी झाले आहेत, हा एक विक्रम आहे. कावड यात्रादेखील कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू झाली आहे आणि मी सर्व सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाचे त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आभार मानू इच्छितो” असे त्यांनी स्पष्ट केले.
यात्रेकरूंचे वैयक्तिकरित्या स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी अनेकांचे पाय धुतले. यात्रेकरूंच्या कपाळावर टिळा लावून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. सा स्वागताबाबत धामी म्हणाले की “आम्ही सर्वराज्यातील शिवभक्तांचे स्वागत करू. ही केवळ औपचारिकता नाही. मी स्वतः शिवभक्त आहे आणि प्रत्येक कावड यात्रेकरूमध्ये शिवाचा अंश असतो असे माझे मत आहे”. धामी यांनी यात्रेकरूंचे स्वागत करताना त्यांना शाल आणि प्रसादही दिला.
श्रावण महिन्यात कावड यात्रेचे आयोजन केले जाते. या यात्रेमध्ये शिवभक्त गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमधून पवित्र पाण्याचे घागर घेऊन घरी परततात. या यात्रेदरम्यान उत्तराखंडमधील हरिद्वार, गायमुख आणि गंगोत्री, बिहारमधील सुलतानगंज आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज, अयोध्या किंवा वाराणसी या तीर्थक्षेत्रांमधून पाणी घेतले जाते.
कावड यात्रा मार्गावर येणारी सर्व दारू आणि मांसाची दुकाने राज्यात बंद असतात. सुमारे १०,००० पोलीस कर्मचारी, १० हून अधिक अतिरिक्त एसपी, ३८ डेप्युटी एसपी आणि एटीएसच्या पाच कंपन्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. ४०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन हे यात्रेवर लक्ष ठेऊन असणार आहेत.