नागपूर : नागपूरची वज्रमूठ सभा यशस्वी झाली असली तरी यानिमित्ताने काँग्रेसमधील मानापमान नाट्य रंगले, माजी मंत्र्यांच्या अनुपस्थितीने या पक्षात सर्वच काही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे.
रविवारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. सभेला झालेल्या प्रचंड गर्दीमुळे सभेच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सत्ता गेल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशेची भावना या सभेमुळे दूर होण्यास मदत होणार असली तरी नेत्यांमधील बेबनावाचे काय, हा प्रश्न उरतोच. सभेच्या निमित्ताने सर्व गट कामाला लागले असे वरवर दिसत होते. पण काँग्रेसचे वरिष्ठ नेते व नागपूरचे माजी पालकमंत्री नितीन राऊत हे या सभेपासून अलिप्त होते. त्यांनी या संदर्भात वाच्यता केली नाही, पण ते सभेतही आले नाही. ते त्या दिवशी भंडारा दौऱ्यावर होते.
हेही वाचा – सचिन पायलट अशोक गेहलोत सरकरविरोधात पुन्हा आक्रमक, म्हणाले “उपोषणाला आठवडा झाला, पण…”
शहरात सभा असूनही काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचा सहभाग शहरातील कार्यकर्त्यांना सभेत आणण्यापुरताच मर्यादित होता. ते सभेला उपस्थित होते पण त्यांची नाराजी लपून राहिली नाही. काँग्रेसचा शहर अध्यक्ष सभेच्या नियोजन प्रक्रियेत कुठेही नाही हे चित्र ठाकरे समर्थकांना अस्वस्थ करून गेले. दुसरीकडे त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याने ठाकरेंना डावलले जात आहे का? अशीही चर्चा सुरू झाली होती. त्याचे पडसादही सभेपूर्वी झालेल्या तयारी आढावा सभेत उमटले. थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पुढेच ठाकरे यांनी मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांचा महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना विचार होत नाही, अशी भावना व्यक्त करून आपली नाराजी व्यक्त केली.
नेत्यांच्या नाराजीचे मूळ पक्षांतर्गत गटबाजीत दडलेले आहे. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या ऊर्जाखात्याने कोलवॉशरीच्या संदर्भात दिलेल्या एका कंत्राटदारावर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. जिल्ह्याच्या राजकारणात केदार विरुद्ध राऊत असा वाद आहेच. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघात काँग्रेसने कोणाला पाठिंबा द्यावा यावरून केदार विरुद्ध पटोले असे चित्र निर्माण झाले होते. केदार माध्यमिक शिक्षक संघाचे अडबाले यांच्यासाठी आग्रही होते तर पटोलेंचा कल शिक्षक भारतीकडे होता. अखेर पटोले यांनी अडबाले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला व ते विजयीही झाले. त्यामुळे वादही संपुष्टात आला. तशाच प्रकारे सभा यशस्वी झाल्याने यानिमित्ताने झालेल्या नाराजी नाट्यावर सध्या पडदा पडला आहे. मात्र कधी त्याचा स्फोट होईल हे सांगात येत नाही.
सभेसाठी आपल्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती पूर्णपणे पार पाडली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी दिली, तर सर्वांच्या सहकार्यामुळे व सर्वांना सोबत घेऊनच सभेचे नियोजन करण्यात आले होते व त्यामुळेच सभा यशस्वी झाल्याचा दावा, सभेच्या तयारीची जबाबदारी असलेले काँग्रेस नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी केला.