मुंबई : राजकारणातील प्रस्थापित घराण्यांना विरोध करत वंचित समुहांना न्याय देण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (भारिप) विसर्जन करत वंचित बहुजन आघाडीची स्थापन केलेल्या ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने सामाजिक अभिसारण करीत राज्यात २२ लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केले आहेत. मात्र वंचितच्या जाहीर झालेल्या यादीमध्ये एकही ब्राह्मण जातीचा तसेच कोणत्याही जातगटाची एकही महिला उमेदवाराचा समावेश नाही.

वंचित आघाडीचे महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचे मनसुबे उधळल्यानंतर पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची घोषणा करण्याचा धडाका लावला आहे. आजपर्यंत वंचितच्या चार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यामध्ये कुणबी मराठा ३, मराठा २, बौद्ध ३, मुस्लिम ३, धनगर २, बंजारा २, आदिवासी १, लिंगायत १, माळी २, तेली, १, मातंग १, जैन १ असे एकुण २२ सर्वजातीय, सर्वधर्मिय उमेदवार दिलेले आहेत.

हेही वाचा…धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

शिरुरमध्ये मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितने ऐनवेळी रद्द केली. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील केमसिंग पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. वंचितने ७ मतदारसंघात इतर उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामध्ये अमरावतीत आंबेडकर यांचे सख्खे बंधू आंनदराज यांना, रामटेकमध्ये अपक्ष उमेदवार किशोर गजभिये यांना, नागपुरातून काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना, बारामतीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना, कोल्हापुरात काँग्रेसचे श्रीमंत शाहू महाराज आदींना वंचितने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

यासंदर्भात वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर म्हणाल्या की, २०१९ च्या विधानसभेला आम्ही राज्यात २३४ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये एकही ब्राह्मण उमेदवार नव्हता. महिला या वंचितांमधील वंचित आहेत, अशी पक्षाची ठाम भूमिका आहे. आमच्या दोन याद्या आणखी जाहीर होणे बाकी आहे, त्यामध्ये महिला उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

हेही वाचा…अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आप संकटात; पक्षाचे १० पैकी सात खासदार गायब

वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर झाल्या आहेत, त्यामध्ये उमेदवारांच्या नावापुढे त्याची जात लिहिलेली आहे. विशेष बाब म्हणजे वंचितने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेसच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत असलेल्या अकोला मतदारसंघात मात्र काँग्रेसने उमेदवार दिलेला आहे.

Story img Loader