अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून येते. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीला अपयशाचा सामना करावा लागला. पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. सोबतच जनाधार घटल्याने अकोला जिल्ह्यातील वंचितच्या प्रभावाला धक्का बसल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वंचितने लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली. २०१९ च्या तुलनेत या दोन्ही निवडणुकांमध्ये वंचितला मिळालेले मतदान कमी झाल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्हा वंचितचे प्रभाव क्षेत्र मानल्या जाते. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अकोला जिल्हा परिषदेवर वंचितची सत्ता आहे. वंचितला जिल्हा परिषदेत मिळणारे यश हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कायम राहत नाही. लोकसभा निवडणुकीत ५३ हजारावर मतदान वाढले असतांना ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मतांमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये एक हजार ७०१ मतांनी घट झाली. विधानसभा निवडणुकीत सुद्धा वंचितच्या उमेदवारांच्या बाबतीत तोच कित्ता कायम राहिला. मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला असतांना वंचितच्या मतांमध्ये मात्र कमतरता झाली.

बाळापूर व अकोला पश्चिम वगळता इतर सर्वच मतदारसंघांत वंचितचे मतदान कमी झाले. २०१९ मध्ये बाळापूरमध्ये वंचितला ५० हजार ५५५ मते पडली होती, यावेळेस वंचितच्या खतिब यांना ७० हजार ३४९ मते मिळाली. अकोला पश्चिम मतदारसंघात गेल्या वेळेस २० हजार ६८७, तर आता वंचित समर्थित हरीश आलिमचंदानी यांना २१ हजार ४८१ मते पडली. अकोला पूर्व मतदारसंघात वंचितची सर्वाधिक घसरण झाल्याचे दिसते. ज्ञानेश्वर सुलताने यांना पक्षाने उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्याविषयी अंतर्गत नाराजी असल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसला. २०१९ मध्ये या मतदारसंघात वंचितला ७५ हजार ७५२ मते मिळाली होती. आता तिसऱ्या स्थानावर घसरण होऊन ५० हजार ६८१ मतांसह वंचितची तिसऱ्यास्थानी घसरण झाली. लोकसभा निवडणुकीत ६० हजार ३३४ मते घेऊन वंचितने दुसरेस्थान मिळवले होते. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला तेवढी मते देखील मिळवता आली नाहीत. मूर्तिजापूर मतदारसंघात २०१९ मध्ये वंचितने भाजपला काट्याची लढत देत ५७ हजार ६१७ मते घेतली होती. आता पक्षाचे सुगत वाघमारेंना ४९ हजार ६०८ मते मिळाली. ते देखील तिसऱ्या स्थानावर घसरले. अकोटमध्ये सुद्धा उमेदवारावर नाराजी होती. २०१९ मध्ये ४१ हजार ३२६ मिळालेले मतदान २०२४ मध्ये ३४ हजार १३५ वर आले. अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात देखील वंचितचे मतदान कमी झाले. गेल्या वेळेसचे ३४ हजार ४७५ वरून आता १५ हजार ९०७ वर आले आहे. घसरलेल्या मतदानाचा टक्का वंचितसाठी चिंतनाचा विषय ठरणार आहे.

हे ही वाचा… हेमंत ओगले : अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचा एकांडा शिलेदार

३८ हजार मते कमी

अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचितला २०१९ मध्ये दोन लाख ८० हजार ४१२ मते मिळाली होती. आताच्या निवडणुकीत त्याच मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांना दोन लाख ४२ हजार १६१ मते मिळाली आहेत. मतदानाची टक्केवारी वाढली, मात्र वंचितला मिळालेले मतदान घटल्याचे स्पष्ट होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aghadi impact in akola district votes percentage descending print politics news asj