नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाला समर्थन देत मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक राजकारणात खेचण्याचा प्रयत्न करणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर आता विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढून ओबीसी समाजाला साद घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
वंचित घटकाला राजकीय न्याय मिळून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आहे. या आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवतात. २०१९ च्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाला चांगली मते मिळाली. मात्र, २०२४ लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची कामगिरी जेमतेम राहिली. राज्यात दोन-तीन जागा वगळता मतदारांनी या पक्षाला फार महत्त्व दिले नसल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून येते. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे म्हणून आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले. आंबेडकर यांनीही अनेक दिवस आघाडी नेत्यांशी चर्चा केली. परंतु महाविकास आघाडीने मनोज जरांगे ‘फॅक्टर’कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत ॲड. आंबेडकर यांनी नवीन आघाडीची घोषणा केली. मार्च २०२४ मध्ये त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला. जरांगे पाटील यांच्याशी चर्चाही केली. मात्र जरांगे यांनी निवडणूक लढण्याबाबत काही दिवसांनी कळवतो असे सांगून अप्रत्यक्षपणे प्रस्ताव फेटाळला. काही दिवसांनी निवडणूक राजकारणात प्रवेश करणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.. आता ॲड. आंबेडकर यांनी ओबीसींकडे मोर्चा वळवला असून ते विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढणार आहेत. चैत्यभूमी येथून २५ जुलैला यात्रेचा प्रारंभ होणार असून ८ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे समारोप होणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, जालना जिल्ह्यातून जाणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत. यात ओबीसींसाठीच्या प्रमुख मागण्यांवर भर दिला जाणार आहे.
हेही वाचा : उत्तर प्रदेशमधील खराब कामगिरीनंतर भाजपा ‘या’ दलित राजाबरोबर जोडू पाहत आहे लखनौचे नाते
यात्रेमागची आंबेडकर यांची भूमिका
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर वंचित बहुजन आघाडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ओबीसी संघटनांची आहे. आघाडीची भूमिका गावागावात पोहोचावी म्हणून आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे, असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी यात्रेबाबत माध्यमांना सांगितले होते.