राहुल गांधी यांनी आपला भाऊ वरूण गांधी याबाबत एक वक्तव्य केलं आहे. वक्तव्य चर्चेत आहे. राहुल गांधी आणि वरूण गांधी या दोघेही चुलत भाऊ आहेत. राहुल गांधी यांनी होशियारपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना वरूण गांधींविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी यांनी एक भाष्य केलं आहे.
राहुल गांधी यांना काय विचारण्यात आला प्रश्न?
राहुल गांधी यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भारत जोडो यात्रा काढली आहे. ही यात्रा देश जोडते आहे. मात्र तुम्ही तुमचं कुटुंबही जोडणार का? वरूण गांधी हे तुमचे भाऊ आहेत त्यांना तुम्ही भेटणार का? त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन करणार का?
काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी?
राहुल गांधी म्हणाले, “वरूण गांधी हे भाजपात आहेत. ते जर भारत जोडो यात्रेत सहभागी झाले तर त्यांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. पण माझी आणि वरूण गांधी यांची विचारधारा वेगवेगळी आहे. माझी विचारधारा वेगळी आहे. मी कधीही संघ मुख्यालयात जाऊ शकत नाही. गळा चिरला तरीही मी संघ मुख्यालयात किंवा कुठल्याही संघ कार्यालयात जाणार नाही. माझं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरूण गांधी आहेत त्यांनी एक अशी वेळ होती की वेगळी विचारधारा निवडली. मी ही गोष्ट कधीही मान्य करू शकत नाही. मी वरूण गांधींना भेटू शकतो, त्यांना आलिंगन देऊ शकतो मात्र त्यांची विचारधारा मी कधीच अंगिकारू शकत नाही. कधीच नाही. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. “
वरूण गांधी काय म्हणाले होते? राहुल गांधींनी सांगितला तो किस्सा
वरूण गांधी यांनी मला एकदा सांगितलं की RSS देशात खूप चांगलं काम करतं आहे. मी त्यांना म्हणालो की तुम्ही आपल्या घराण्याची (गांधी) पार्श्वभूमी काय आहे? आपला इतिहास काय आहे ते वाचलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे. ते जर तुम्ही केलंत तर तुम्ही हे कधीही म्हणणार नाही. मात्र वरूण गांधी हे त्यांच्या वेगळ्या वाटेने गेले. माझ्या मनात त्यांच्याविषयी तिरस्कार नाही. मात्र मी ती विचारधारा कधीही मान्य करू शकत नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
वरूण गांधी कोण आहेत?
काँग्रेसचे दिवंगत नेते संजय गांधी यांचे पुत्र वरूण गांधी आहेत. वरूण गांधी यांच्या आईचं नाव मेनका गांधी आहे आणि त्यादेखील भाजपात आहेत. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत वरूण गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या पिलीभीतमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. वरूण गांधी हे गेल्या काही दिवसांपासून मुळीच चर्चेत नाहीत. भाजपात त्यांचं भवितव्य फार काही बरं दिसत नाही असं राजकारणाचे अभ्यासक सांगतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वरूण गांधी यांना तिकिटही मिळणार नाही अशी शक्यता आहे. भाजपामध्येच वरूण गांधी राहिले तर त्यांना काही मोठी जबाबदारी मिळेल अशीही शक्यता कमी आहे. देशात जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं तेव्हा वरूण गांधी यांनी सरकारच्या विरोधात भाषण केलं होतं. सध्या त्यांना भाजपात साइडलाइन करण्यात आलं आहे.