पुणे : लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश केलेले मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी ‘वंचित’ची साथ सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मोरे यांच्याकडून खडकवासला किंवा हडपसर या दोनपैकी एका मतदारसंघावर उमेदवारीसाठी दावा केला जाण्याच्या शक्यतेने प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी आणि लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील होते. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संजय राऊत यांचीही त्यांनी भेट घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून पुण्याची निवडणूक लढविली होती. मात्र, त्यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते.

हेही वाचा… काँग्रेसने मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लागू केल्याचे मोदींचे वक्तव्य; काय आहे इतिहास?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वंचितची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. मोरे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. या भेटीवेळी खासदार, प्रवक्ते संजय राऊत उपस्थित होते. मोरे येत्या मंगळवारी (९ जुलै) पक्षप्रवेश करणार आहेत.

यावर अवलंबून राजकीय भवितव्य…

आगामी विधानसभा निवडणुकीत मोरे यांच्याकडून हडपसर किंवा खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीत शिवसेनेला कोणते मतदारसंघ मिळणार, यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. हडपसरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे प्रबळ दावेदार आहेत. खडकवासला मतदारसंघातून याच पक्षाचे सचिन दोडके हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

हेही वाचा… हिंदू धर्म ते मणिपूर! विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदींनी काय उत्तरे दिली?

लोकसभेला अनामत रक्कम जप्त

लोकसभा निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती. त्यांना ३२ हजार १२ मते मिळाली होती. ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना हडपसरमधून पराभव स्वीकारावा लागला होता.

प्रदीर्घ कालावधीनंतर स्वगृही

वसंत मोरे मूळचे शिवसेनेचे आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते राज ठाकरे यांच्यासमवेत होते. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर मोरे यांची राजकीय अडचण झाली आणि पक्षात ते एकाकी पडले. मनसेतील अंतर्गत गटबाजीमुळे अखेर त्यांनी मनसेला रामराम ठोकून लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविण्याची तयारी केली. मात्र त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी वंचितमध्ये प्रवेश केला होता. वंचितला सोडचिठ्ठी देऊन ते शिवसेनेत दाखल होणार आहेत.