यवतमाळ : कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला राळेगाव विधानसभा मतदारसंघ गेली १० वर्षे भाजपच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ आदिवासीबहुल असल्याने अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला राळेगाव विधानसभा मतदारसंघात २४ हजारांचे मताधिक्क्य मिळाल्याने भाजप इथला उमेदवार बदलणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र लोकसभा निवडणुकीत सर्वेक्षणाची टुम भापजच्या अंगलट आली. त्यामुळे आता भाजपचे विद्यमान आमदार प्रा. अशोक उईके यांनाच महायुतीची उमेदवारी मिळणार, हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वास्तविक काँग्रेसमध्ये १५ जण या मतदारसंघात लढण्यास इच्छुक आहेत. मात्र काँग्रेस नवखा उमेदवार देण्याची शक्यता नाही.

राळेगाव हा पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राळेगाव, कळंब, बाभूळगाव हे तालुके येतात. प्रा. पुरके यांनी या मतदारसंघातून १९९५, १९९९, २००४ आणि २००९ असे चारवेळा प्रतिनिधित्व केले. क्रीडा व युवक कल्याण मंत्री ते आदिवासी विकास मंत्री, शिक्षणमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष अशा विविध पदांवर प्रा. पुरके यांनी काम केले. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत कलहात २०१४ मध्ये मोदी लाटेत प्रा. पुरके पराभूत झाले व भाजपचे प्रा. डॉ. अशोक उईके निवडून आले. पहिल्याच टर्ममध्ये प्रा. उइके यांना अखेरचे काही महिने आदिवासी विकास मंत्री म्हणून संधी मिळाली. २०१९ मध्येही ते या मतदारसंघातून विजयी झाले. दहा वर्षांत त्यांनी येथे निष्ठापूर्वक काम केले. मात्र संघटन पातळीवर भाजपला राळेगावमध्ये अद्यापही पकड घेता आली नाही. शेतकऱ्यांमध्ये भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांची नाराजी असली तरीही लाडकी बहीणसारख्या योजनांचा थोडा फायदा भाजपला होऊ शकतो.

हेही वाचा – रामटेकच्या बदल्यात कोकणात जागा, काँग्रेसचा शिवसेनेला प्रस्ताव

सलग दोन पराभवांमुळे डोळे उघडलेल्या काँग्रेसमध्ये सध्यातरी एकी दिसत आहे. त्याचा लाभ प्रा. पुरके यांना होण्याची चिन्हं आहेत. आमदार उईके हे मतदारसंघात सतत फिरत असतात. त्यांचा मतदारसंघात सहज वावर असला तरी बाभूळगावसारख्या तालुक्यात आमदार भेटत नसल्याची ओरड आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून येथे काही इच्छुक उमेदवार आहेत. बदललेली राजकीय समीकरणे बघता महायुती किंवा महाविकास आघाडी जोखीम घेण्याची शक्यता नसल्याने उईके व पुरके यांनाच उमेदवारी मिळणार जवळपास हे निश्चित झाले आहे.

हेही वाचा – अमरावती जिल्ह्यात भाजपची कोंडी

ऐनवेळी वंचित, तिसरी आघाडी येथे मैदानात उतरू शकतात. मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवणार नाही, असे जाणकर सांगतात. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे वळलेली २४ हजार मते पुन्हा भाजपकडे वळवण्याचे शिवधनुष्य आमदार उईके यांना पेलावे लागणार आहे. काँग्रेसची पारंपरिक मते भाजपने गेल्या १० वर्षांत त्यांच्याकडे खेचली. हे मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळवण्याचे आव्हान माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासमोर राहणार आहे.