सुजित तांबडे, लोकसत्ता
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढतीची शक्यता असताना आता वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी वंचितचा पाठिंबा मागितला असला तरी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शवत संघटनेचाच उमेदवार उभा करण्याचा निर्धार केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने तब्बल ६५ हजार मते घेतली होती. या निवडणुकीतही वंचितमुळे मतांचे विभाजन होणार असल्याने वंचितचा आतापासूनच महाविकास आघाडीने धसका घेतला असून, वंचितचा उमेदवार ‘मते घेणारा’ असेल, याबाबत महायुती ‘प्रचंड आशावादी’ आहे,
हेही वाचा >>> Lok Sabha Election 2024: भाजपवर दबावासाठी शिंदे सेनेच्या दंड बैठका
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरे यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट शब्दात विरोध केला आहे. मोरे हे उमेदवारी मिळवण्यासाठी वणवण हिंडत आहेत. सुरुवातीला त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मिळण्यासाठी चाचपणी केली. मात्र, पवार यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मराठा महासंघाकडे मोर्चा वळवला. मराठा महासंघाच्या बैठकांनाही त्यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर मनोज जरांगे यांचीही भेट घेतली. मात्र, त्या ठिकाणीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची आंबेडकर यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत मोरे यांना पाठिंबा देण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मोरे यांना पाठिंबा देण्याऐवजी पक्षाचा उमेदवार उभा करावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. त्यानुसार आता वंचितकडून उमेदवार निश्चितीबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार
मोरेंना विरोध का?
वंचित बहुजन आघाडीची पुण्यामध्ये ताकद आहे. पक्षाचे मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोरे यांना पाठिंबा देण्याऐवजी पक्षाचा उमेदवार उभा करण्याबाबतची चर्चा बैठकीत झाली आहे. आगामी विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाचा उमेदवार उभा करण्याचे निश्चित झाले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी सांगितले.
दोन दिवसांत उमेदवार?
पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मात्र, उमेदवार कोण, याबाबत येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय होणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक अतुल बहुले यांनी सांगितले.
वंचितची ताकद
गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितने शेवटच्या क्षणी अनिल जाधव यांना उमेदवारी दिली होती. जाधव हे ६५ हजार मते घेत तिसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यांना प्रचारासाठी जेमतेम आठ दिवसांचा कालावधी मिळाला होता. मात्र, तरीही वंचितने लढत दिली होती. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उभा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
काँग्रेस अस्वस्थ, भाजप डोळे लावून
वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रामुख्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. वंचितने उमेदवार दिल्यास काँग्रेसच्या मतांचे विभाजन होऊन काँग्रेसचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांना फटका बसण्याची शक्यता आहे. वंचितचा उमेदवार कोण, याकडे भाजप डोळे लावून बसली आहे. वंचितच्या उमेदवाराने जास्तीत जास्त मते घेतल्यास भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची लढाई सोपी होणार आहे. त्यामुळे वंचितच्या उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.