राजस्थानच्या जयपूर शहरात पितांबर पेठ येथे भविष्यकाळातील पंडित घडविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या प्रकारे वसतिगृहात राहून मुले क्रमिक शिक्षण घेतात. त्याप्रमाणे पितांबर पेठमध्ये वैदिक शिक्षणाचे धडे देऊन उद्याचे पुजारी, पंडित घडविण्याचे काम सुरू आहे. राजस्थानचे हे २६ वे सरकारमान्य वेद विद्यालय आहे. सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी १० ते १७ वयोगटांतील मुलांना पाच वर्षांचा कोर्स या विद्यालयात शिकविण्यात येतो. प्राचीन धर्मग्रंथ, मंत्रोच्चार याचे शिक्षण येथे देण्यात येते, अशी माहिती येतील शिक्षकांनी दिली. वैदिक शिक्षण घेत असताना या मुलांना शाळेत जाऊन क्रमिक शिक्षणही घ्यावे लागते. काँग्रेसची हिंदू विरोधी असलेली प्रतिमा मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्या काही वर्षांपासून वेद विद्यालयांवर लक्ष केंद्रित केले असून त्याच्या विकासासाठी राज्य अर्थसंकल्पात तरतूददेखील केलेली आहे. ‘द प्रिंट’ या संकेतस्थळाने जयपूरस्थित पितांबर पेठमधील ‘श्री गुरु कृपा वेद विद्यालया’ला भेट दिली असून याबद्दलची सविस्तर माहिती प्रकाशित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थान सरकारचा मदतीचा हात!

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वेद विद्यालयाने सर्वबाजूने सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात त्यांनी कल्याणकारी योजनांसाठी निधी देत असताना हिंदू धर्म आणि परंपरा जपण्यासाठी कार्यरत असणाऱ्यांनाही निधी दिला आहे. जसे की, आणखी १३ जिल्ह्यांमध्ये वेद विद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अद्यापही असे विद्यालय नाही. राजस्थान विधानसभा निवडणुकीला अवघे एक वर्ष राहिले आहे. गेहलोत सरकार वेद विद्यालयांना मदत करून भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राजस्थानसारख्या राज्यात काँग्रेसने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करणे यात नवे काही नाही. पण काँग्रेस हिंदूंच्या विरोधातच आहे, हा जो आरोप भाजपाकडून करण्यात येतो, त्याचे समूळ उच्चाटनच करायचे प्रयत्न गेहलोत सरकार करीत आहे.

कसा असतो दिनक्रम?

वेद विद्यालयात धार्मिक शिक्षण घेणे आणि त्यासोबत शाळेत जाऊन क्रमिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बराच संघर्ष करावा लागतो. येथील विद्यार्थी सकाळी ४.३० वाजता उठतात. सकाळी तयार होऊन ६ वाजता गायत्री मंत्राचे उच्चारण करण्यासाठी मंदिरात जमतात. तिथून पुढे ६.३० वाजता त्यांना नाश्ता दिला जातो. तासाभराने विद्यार्थी शाळेत जातात आणि इतर विद्यार्थ्यांप्रमाणे गणित, इंग्रजी वगैरे विषयांचा अभ्यास करतात. दीड वाजता आश्रमात येऊन दुपारचे जेवण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना थोडा वेळ विश्रांती घेण्याची परवानगी दिली जाते. विश्रांतीनंतर लगेचच वैदिक शिक्षण देण्यास सुरुवात होते. दुपारी ४ ते ६ पर्यंत विद्यार्थी यजुर्वेद, मंत्र, विविध धार्मिक विधींच्या पद्धती आणि पंचांग व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात. सायंकाळी धार्मिक शिक्षण झाल्यानंतर थोडा वेळ खेळ खेळण्यासाठी मुलांना मोकळे सोडले जाते. रात्री आठ वाजता जेवण झाल्यानंतर मुले शाळेचा गृहपाठ पूर्ण करून झोपी जातात.

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून पितांबर पेठेत आलेला १७ वर्षांचा गोविंद मिश्रा सांगतो की, आम्हाला टीव्ही पाहायला, मोबाइल वापरायला जराही सवड नाही. ही मौजमजा नंतरही करता येऊ शकते. सध्या आम्ही फक्त शिक्षण घेण्यावर भर देत आहोत. वेद मातेची सेवा करण्यातच आम्ही धन्यता मानतो. माझे आजोबा, वडील पुजारी होते. मीही त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतली. मला वाटते की, माझ्या पिढीतल्या मुलांनी सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे.

वेद विद्यालयांची स्थापना कधी झाली?

भाजपच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी २००६-०७ च्या काळात वेद विद्यालयाची घोषणा केली होती. प्रत्येक वेद विद्यालय एखाद्या तरी धार्मिक संस्थेसोबत जोडले गेलेले आहे. संस्कृत अकादमीकडून मान्यता मिळाल्यानंतर राज्याच्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या देखरेखेखाली वेद विद्यालय सुरू करण्यात येते. पाचवीपर्यंत शाळा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच वेद विद्यालयातील पाच वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश दिला जातो. पाच वर्षांसाठी केवळ ५० विद्यार्थी याप्रमाणे प्रतिवर्षी केवळ १० विद्यार्थ्यांना वेद विद्यालयात प्रवेश देण्यात येतो.

सार्वजनिक खासगी सहकार्याने (PPP) चालविण्यात येणाऱ्या या विद्यालयात धार्मिक संस्था पायाभूत सुविधा आणि दैनंदिन गरजा भागविण्याचे काम करते. तर राज्य सरकार प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला ५०० रुपयांचा शैक्षणिक भत्ता देते. येथील शिक्षकांना प्रतिमहा ८००० रुपये पगार दिला जातो. राजस्थानमध्ये सध्या ६५० विद्यार्थी विविध वेद विद्यालयांत धार्मिक शिक्षण घेत आहेत.

काँग्रेसचे सोशल इंजिनीअरिंग

वेद विद्यालयांच्या शाखा वाढविण्यासोबतच गेहलोत सरकार संस्कृत शिक्षण देण्यावरही भर देत आहे. राज्य सरकारने १६ संस्कृत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. तसेच १०० कोटींचे पॅकेज देऊन मंदिराचा विकास करण्याची घोषणा केली आहे. राजस्थानचे राजकीय जाणकार सांगतात की, भाजपाने स्वतःला हिंदुत्वाचे ‘ठेकेदार’ असल्याचे लोकांच्या मनावर रुजवले आहे. भाजपाची ही प्रतिमा बाजूला सावरून काँग्रेसला आपली स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनेदेखील हीच रणनीती अवलंबली आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेसचे सरकार आहेच, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार फोडून भाजपाचे सरकार बनले.

छत्तीसगढमध्ये काँग्रेसने राम आणि गाय या दोघांना महत्त्वाचे स्थान दिले आहे. तर मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने पक्षांतर्गत पुजारी विभागाची स्थापना केली आहे. नुकतेच या विभागाकडून ‘धर्म संवाद’ नावाचा कार्यक्रमही घेण्यात आला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedic residential schools in rajasthan for veda education and training future pandits to save sanatana dharma kvg