मुंबई : महाविकास आघाडीने आपले जागांचे सूत्र जाहीर करून २४ तास उलटत नाहीत तोच पुन्हा विदर्भातील जागांवरून शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. काँग्रेस किमान १०० ते १०५ जागा लढवेल असे सांगताना आम्ही आकड्यावर नाही तर गुणवत्तेवर जागावाटप केल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त करताच शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी वडेट्टीवार हे ‘विद्वान गृहस्थ आहेत ते आधी शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले. ते गुणवत्तेवर बोलत आहेत त्यांचे स्वागत आहे’ असा टोला लगावला.
हेही वाचा >>> १८ जागांमध्ये छोट्या पक्षांत रस्सीखेच; आघाडीने दिलेली लेखी हमी उघड करण्याचा इशारा
महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ८५ जागांचे सूत्र मांडण्यात आल्याचे सांगून २७० जागांवर सहमती झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र २५५ जागांच्या सूत्रात उरलेल्या १५ जागांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या १५ जागांची तिन्ही पक्षांमध्ये अदलाबदली केली जाईल, अशी माहिती दिली. पण त्याचबरोबर त्यांनी १५ पैकी बहुतांश जागा काँग्रेसकडे येतील, असे विधान केले. काँग्रेसचा एकूण जागांचा आकडा १०० ते १०५ च्या दरम्यान असेल. पण मुळात जागावाटप करताना कुणाला किती जागा असा विचार न करता गुणवत्तेच्या आधारावर जागावाटपाचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्याने शिवसेना ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. यावर बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसचा १०० जागांचा दावा सपशेल फेटाळून लावला. आता फार घोळ घालून चालणार नाही. शेवटच्या क्षणी काही मतदारसंघांत बदल होतील, उमेदवार बदलले जातील त्याविषयी चर्चा सुरू आहे. पण यापलीकडे काही घडणार नाही. जागावाटपाचा ८५-८५-८५चे सूत्र कायम राहील असे ते म्हणाले.