लातूर : लातूरच्या क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभा निमित्त आयोजित कार्यक्रमात लातूर शहर विधानसभेचे आ. अमित देशमुख व निलंग्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर या दोघांची चांगलीच जुगलबंदी रंगली. एकमेकांना कोपरखळ्या मारत केलेल्या भाषणामुळे पुन्हा एकदा लातूरकरांना गोपीनाथ मुंडे व विलासराव देशमुख यांच्या जोड गोळीच्या आठवणीत रमवून टाकले.
क्रेडाईचे प्रदेशाध्यक्ष बारामतीचे प्रफुल्ल तावरे यांनी लातूर पॅटर्न केवळ शिक्षणात नाही तर क्रीडाईच्या कामातही आहे. लातूरकरांकडून आम्हाला शिकण्यासारखे भरपूर आहे. या शब्दात बांधकाम क्षेत्रातील लातूरकरांच्या कामाचे कौतुकोद्गार काढले, त्याचा धागा पकडत आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले बारामतीकरांनी लातूरचे कौतुक केल्यानंतर स्वाभाविकपणे आम्हाला आनंद होतोय. लातूरात सत्ताधारी व विरोधक दोघांनाही आपली जबाबदारी समजत नसल्यामुळे दोघेही चाचपडत आहेत. सत्ताधारी हे पाण्याच्या प्रश्नावर मोर्चा काढतात तर विरोधक हे बैठका घेतात.दोघांनाही आपली नवी जबाबदारी लक्षात घेऊन काम करण्याची गरज असल्याचे सांगून अमित देशमुखांना त्यांनीं तुम्ही आता सत्तेत नाही तर विरोधी पक्षात आहात. विरोधी पक्षाची चांगली जबाबदारी पार पाडा असा सल्ला दिला.
आम्ही १४ वर्ष विरोधात असल्यामुळे आम्ही सत्ताधारी आहोत हे आमच्या लक्षातच येत नाही. सत्ताधारी म्हणून कसे वागायचे असते ?याचा वर्ग देशमुख तुम्ही घ्या, विरोधी पक्षाने कसे वागायचे असते ?याचा वर्ग आम्ही घेऊ असे सांगितले. लातूरात अमेरिकेच्या धरतीवर एका व्यासपीठावर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन धोरण, नीती यावर चर्चा व्हायला पाहिजे, सुसंस्कृतपणा हा लातूरचा वारसा आहे तो आपण जपला पाहिजे अशी भूमिका मांडली.
निलंगेकरांच्या भाषणाचा धागा पकडत आ.अमित देशमुख म्हणाले लातूरात विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर व शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकारणात काम करण्याची एक पद्धत आखून दिली आहे. प्रशासनात शून्य राजकीय हस्तक्षेप करण्याची त्यांची भूमिका होती तीच भूमिका आपण वठवत आहोत. प्रशासनाने लाल फितीचा कारभार करायला नको. सामान्य माणसाची अडचण, पिळवणूक होता कामा नये. विरोधी पक्ष म्हणून आपण आमची भूमिका वठवू व आमच्या या भूमिकेत संभाजी पाटील निलंगेकर हेही सोबत राहणार असल्याचे ते म्हणाले. संभाजी पाटील यांनी एका व्यासपीठावर अमेरिकेसारखे सर्वांनी भूमिका मांडायला एकत्र यावे अशी सूचना मांडली पण अन्य पक्ष शिल्लक राहिले तरच हा कार्यक्रम करता येईल मात्र संभाजी पाटील यांचा पक्ष ज्या पद्धतीने काम करत आहे त्यामुळे अशी संधी मिळेल का? असा सवाल उपस्थित केला. महापालिका आयुक्त देविदास जाधव यांनी गेल्या पंधरा वर्षात लातूर शहराच्या लोकसंख्येत १०० टक्के वाढ झाली आहे व शहर झपाट्याने वाढत असल्याचे ते म्हणाले.
तो मुद्दा पकडत देशमुख यांनी शंभर टक्के लातूर शहर वाढते आहे, सगळ्या बाबी चांगल्या होत आहेत, संभाजीराव तुम्हाला काय वाटते ?असा प्रश्न विचारत एरवी संभाजी पाटील जी टीका करतात त्याला या प्रश्नातून उत्तर दिले. या कार्यक्रमात क्रीडाईचे नूतन अध्यक्ष उदय पाटील यांनी संभाजी निलंगेकरांचा उल्लेख चुकून देशमुख असा केला त्याचा धागा पकडत अमित देशमुख म्हणाले संभाजी पाटलांना गढी बद्दल प्रचंड राग आहे पण क्षणापुरते का होईना पाटलांनी देशमुख केले. त्यावर संभाजी पाटील यांनी माझी सासूरवाडी देशमुख आहे असे सांगितले तेव्हा अमित देशमुख यांनी बघा सासूरवाडी देशमुख असतानाही तुम्हाला देशमुखी बद्दल राग आहे अशी कोपरखळी मारली. विकासाच्या प्रश्नावर मैत्रीपूर्ण संबंधातून आपण एकत्र राहू व काम करू असे आवाहन त्यांनी केले.
निलंगेकर व देशमुख एका व्यासपीठावर एकत्र येऊन खेळीमेळीच्या वातावरणात आपापल्या भूमिका मांडल्यामुळे लातूरकरांना पुन्हा एकदा मुंडे- देशमुख यांच्या कार्यक्रमाची आठवण झाली.