VHP : मागच्या आठवड्यात प्रयागराज या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत काशी आणि मथुरा येथील मशिदींवर हिंदूंचा हक्क कायदेशीर मार्गाने कसा मिळवता येईल? याबाबत चर्चा झाली. संभल या ठिकाणच्या शाही जामा मशिदीवरच्या हिंदूंच्या हक्कांचा मुद्दाही काही संतांनी विहिंपच्या बैठकीत उपस्थित केला. मात्र तूर्तास यावर विहिंपने मौन बाळगलं आहे.
आलोक कुमार यांनी काय सांगितलं?
विहिंपच्या ( VHP ) मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त करणं आणि तसंच काशी व मथुरा या प्रश्नांवर भर देण्यात आला. विहिंपने १९८४ मध्ये एक ठराव केला होता ज्यानुसार काशी येथील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील ईदगाह मशीद ताब्यात घेण्यावर सर्वांचं एकमत झालं होतं. आता आम्ही त्यावरच भर देत आहोत. अशी माहिती आलोक कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
विनोद बन्सल यांनी नेमकं काय सांगितलं?
विहिंपचे ( VHP ) राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनीही सांगितलं की येत्या काळात न्यायालयात कायदेशीर मार्गाने लढाई लढून आम्ही काशी आणि मथुरा येथील वाद सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु. त्याबद्दल दोन दिवसीय बैठकीत साधकबाधक चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं. विहिंपचं ( VHP ) मार्गदर्शक मंडळ म्हणजे सुमारे ३५० संतांचा समूह आहे. हे मार्गदर्शक मंडळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न आहे. त्यांच्याशीही विविध विषयांवर चर्चा सुरु असते. आता विहिंपच्या ( VHP ) विश्वस्त मंडळाची बैठक ही फेब्रुवारी महिन्यात होणार आहे.
संघ परिवार संभल प्रश्नाबाबत शांत
संभल प्रश्नी नोव्हेंबर महिन्यात हिंसाचार झाला होता. त्यानंतर या वादापासून लांब राहण्याचं संघ परिवाराने ठरवलं आहे. संघ परिवाराचा अजेंडा वाद उकरुन न काढण्याचा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही प्रत्येक मशिदीमध्ये शिवलिंग शोधण्याची आवश्यकता नाही असं वक्तव्य केलं होतं. संघ परिवाराने अयोध्या, काशी, मथुरा येथील मुस्लिम धार्मिक स्थळं ही मूळ हिंदू धार्मिक स्थळं आहेत असा दावा दीर्घकाळापासून केला आहे. मात्र संभल वादावर संघाने सावध भूमिका घेतली आहे. नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात येणार होतं. त्याविरोधात झालेल्या आंदोलनात पाच जणांचा मृत्यू झाला. ज्यानंतर संघाने या एका धार्मिक स्थळाबाबत अजेंडा बदलला आहे असं दिसून येतं आहे. प्रयागराज या ठिकाणी संतानी आयोजित केलेल्या धर्म परिषदेत एक सूचना करण्यात आली होती. जी धार्मिक स्थळांचा ताबा घेण्याबाबत होती. मात्र यासाठी विहिंपही फार आग्रही नाही अशी माहिती त्यांच्या काही सूत्रांनी दिली आहे. अशात संघानेही संभल प्रश्नावर अंतर राखले आहे हेच दिसून येतं आहे. दरम्यान विहिंपची ( VHP ) बैठक पार पडली त्यामध्ये या मुद्द्यांसह बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, हिंदू समाजातला घटता जन्मदर आणि सामाजिक सलोखा कसा राखता येईल याबाबतही चर्चा झाली.
संभलचा वाद नेमका काय?
कैलादेवी मंदिराचे महंत ऋषिराज गिरी महाराज यांनी दावा केला होता की संभलची शाही मशीद हीच हरिहर मंदिर आहे. महंत ऋषी राज गिरी महाराज यांनी १९ नोव्हेंबर २०२४ सिव्हिल कोर्टात एक याचिका दाखल करून मशिदीचा सर्व्हे करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयानं सात दिवसांच्या आत सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता. त्याचबरोबर सर्व्हे करणाऱ्या टीमला व्हिडिओ आणि फोटोग्राफीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या घटनेनंतर या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. ज्यात पाच जणांचा बळी गेला.