महेश सरलष्कर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभू श्रीरामाशी केल्यामुळे नवा वाद उफाळला असून त्यात आता विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली आहे. ‘ज्यांनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारले, त्यांची तुलना श्रीरामाशी कशी करू शकता? काँग्रेसच्या राजकारणाने गाठलेल्या खालच्या पातळीची ही परिसीमाच म्हणावी लागेल’, अशी संतप्त टीका विहिंपचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी केली आहे.

कन्याकुमारीहून निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत आली असून सुमारे ३ हजार किमीच्या प्रवासामध्ये आपल्याला कुठेही द्वेष-हिंसा दिसली नाही. ही यात्रा समाजाला जोडण्यासाठी असल्याचे राहुल गांधी लालकिल्यावरील भाषणात म्हणाले होते. त्यावर, ‘स्वतःचे आजोबा फिरोज गांधी यांचा ज्यांना विसर पडला. आपल्या आईसोबत ज्यांना राहत येत नाही, ज्यांना स्वतःच्या कुटुंबाला जोडता येत नाही, ते आता देश जोडायला निघाले आहेत’, अशा शब्दांत बन्सल यांनी खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: खडसे पती-पत्नीच्या अडचणीत वाढ

राहुल गांधी यांनी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत केवळ टी शर्ट घालून महापुरुषांच्या समाधींचे दर्शन घेतले. त्याचा संदर्भ देत काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी, ‘राहुल गांधी हे योगी-तपस्वी असून भारत जोडो यात्रा ही त्यांची तपस्या आहे. राहुल गांधींना महापुरुषच म्हटले पाहिजे. श्रीराम सगळीकडे जाऊ शकले नाहीत, पण, त्यांच्या पादुका पोहोचत असत. भरत त्या ठिकठिकाणी घेऊन गेले. उत्तर प्रदेशमध्येही आम्ही पादुका पोहोचवल्या आहेत, आता श्रीरामही येतील’, असे म्हणत राहुल गांधींची तुलना श्रीरामाशी केली. या तुलनेत विश्वहिंदू परिषदेसारखी हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाली आहे.

‘काँग्रेसने श्रीरामाचे अस्तित्व नाकारले होते. केंद्रातील काँग्रेस सरकारने भारतात रामाचा जन्म झालाच नव्हता, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. आता हाच काँग्रेस पक्ष रामाच्या पादुकांबद्दल बोलत आहे. काँग्रेस श्रीरामाचे नाव घेऊ लागला आहे, ही चांगली बाब म्हटली पाहिजे. पण, निदान तुलना तरी योग्य करा. श्रीरामाची तुलना कोणाची करत आहात? श्रीरामाला विरोध करणाऱ्यांशी भगवान रामाची तुलना केली जात आहे. भारतविरोधाने निष्पाप मुलांची मने कलुषित करणाऱ्या सलमान खुर्शीद यांची विधाने म्हणजे विनाश काले विपरित बुद्धी असेच म्हटले पाहिजे. या कृत्याबद्दल काँग्रेसच्या अध्यक्षांनी देशाची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी विहिंपचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी केली आहे.

हेही वाचा: अधिवेशनातील गदारोळात विदर्भातील प्रश्न मागे पडले

अर्ध्याबाह्यांचा उपहास!

दिल्लीत कडाक्याची थंडी असून सकाळच्या सात-आठ अंश सेल्सिअस तापमानात टी शर्ट घालून राहुल गांधी पदयात्रेत सहभागी झाले होते. त्याचा संदर्भ देत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला भाजपच्या समाजमाध्यम विभागाचे प्रमुख अमित मालविया यांनी उपहासात्मक प्रत्युत्तर दिले आहे. ‘आज सकाळी मला इंडिया गेटवर युरोपातून आलेले दोन पर्यटक भेटले. अर्ध्याबाह्यांचा टी शर्ट घालून ते सकाळी चालायला आले होते. मी त्यांना विचारले की, तुम्ही काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहात का? त्यावर ते हसून म्हणाले की त्यांना कडाक्याच्या थंडीची सवय आहे. थंडीत गतीने चालले की शरीरात उब निर्माण होते’, असे ट्वीट मालविया यांनी करून राहुल गांधींच्या टी शर्ट घालण्यावरून पुन्हा टीका केली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vhp criticized congress leader salman khurshid comparison of rahul gandhi with lord shriram which has sparked a new controversy print politics news tmb 01